

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या पत्रीपूल भागात वीज चोरीच्या तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी आरडाओरडा करत त्यांच्या कामात अडथळा आणत मारहाण केली. एका कर्मचाऱ्याचा गणवेश फाडून त्याला दांडक्याने बदडून काढले. आता हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. पोलिसांच्या हाती व्हिडियो लागला असून या व्हिडिओत कैद झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
महावितरणतर्फे कल्याण परिमंडळ हद्दीत वीज चोरी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या तपासणीचा भाग म्हणून महावितरणच्या नेतिवली उपविभागीय कार्यालयातील अभियंते आणि कर्मचारी समुहाने पत्रीपूल भागातील श्रीकृष्णनगर येथे वीज चोरी शोधण्यासाठी शनिवारी गेले होते. श्रीकृष्णनगर भागातील एका सोसायटीत वीज मीटर तपासणीचे काम महावितरणचे पथक करत होते. यावेळी तेथील रहिवाशांनी कर्मचाऱ्यांना तुमच्याजवळ ओळखपत्र आहे का ? अशाप्रकारे वीज मीटर तपासणीसंदर्भात तुमच्याजवळ काही आदेश का ? आदी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी तेथे चार रहिवासी जमा झाले. त्यांनी आरडाओरडा करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तेथून पळून लावण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनेची महावितरणचा एक कर्मचारी त्याच्या मोबाईलमधून व्हिडियो शुटींग करत होता. हे पाहून रहिवाशांनी त्याला हरकत घेतली.
कर्मचारी ऐकत नसल्याचे पाहून चार रहिवाशांनी सदर कर्मचाऱ्यावर लाकडी दांडक्याच्या उपट घातल्या. शिवाय त्या कर्मचाऱ्याच्या अंगावरील गणवेश फाडून टाकला. तसेच इतर कर्मचारी त्या कर्मचाऱ्याच्या बचावासाठी पुढे आले असता त्यांनाही रहिवाशांंनी धक्काबुक्की केली. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या पश्चिमेकडे असलेल्या अटाळीत पाटीलनगर, साईबाबा मंदिराजवळ, संतोषी माता नगर, गावदेवी मंदिर भागातील चाळींमधील घरांची तपासणी करून महावितरणच्या पथकाने या भागातून 6 ग्राहकांच्या घरातील वीज चोरी पकडली. मागील वर्षभर हे रहिवासी महावितरणच्या वीज खांबांवर चोरून आकडे टाकून वीज वापर करत होते. या रहिवाशांनी एकून एक लाखांहून अधिक रकमेची वीज चोरी केली आहे. या वीज चोरीप्रकरणी महावितरणच्या अभियंत्याने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांंनी विद्युत कायद्याने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.