डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडवर मंगळवारी (दि.24) रात्री रक्तरंजित थराराची घटना घडली. जुना वाद मिटविण्याच्या उद्देशाने आयूब शेख या तरूणाला कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर येथे बोलविले. मात्र मांडवलीतून वाद मिटण्याऐवजी वाढल्यानंतर आयूब शेख याला चॉपरने सपासप वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. सुजल जाधव आणि भावेश शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पसार झालेल्या दिनेश लंके आणि अजित खाडे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
आयूब हा कोळसेवाडी परिसरात राहतो. त्याचा काही जणांबरोबर वाद होता. हा वाद मिटविण्यासाठी मंगळवारी रात्री एकच्या सुमारास आयूबला लक्ष्मीनगरात बोलविले होते. आयूब याच्यासोबत त्याचे मित्र अनिल वाल्मीकी आणि सूरज चटोले हे दोघे होते. वाद मिटविण्यासठी दिनेश लंके, अजित खाडे, सुजल जाधव आणि भावेश शिंदे हे चौघे आले. आयूबला भावेश शिंंदे आणि सुजल जाधवने बोलावले होते. मांडवली सुरू असतानाच दुचाकीवरून दिनेश लंके आणि अजित खाडे आले. या दोघांनी आल्याआल्या आयूबला मारहाण केली. अजितने कमरेला खोचलेला चॉपर बाहेर काढून आयूबचा कोथळाच बाहेर काढला. आयुब रक्ताच्या थारोळ्यात तडफडत जागीच ठार झाला. हे पाहून चौघांनी तेथून पळ काढला. आयूबचे मित्र अनिल वाल्मीकी आणि सूरज चटोले यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर आयुबचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. या घटनेनंतर परिसरात काही काळ भितीचे वातावरण होते. आयूबच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोघांना अटक केली आहे. या हत्याकांडातील पसार झालेले मुख्य मारेकरी दिनेश लंके आणि अजित खाडे या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.