

नेवाळी : शुभम साळुंके
कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणार्या अंबरनाथ तालुक्यातील कृषी क्षेत्र धोक्याच्या उंबरठ्यावर आले आहे. तालुक्यातील माणेरे, द्वारलीतील जीन्स कारखान्यातील रासायनिक पाणी नाल्यात सोडले जात असून या नाल्यातील पाणी पंपाद्वारे शेतीसाठी घेतले जात आहे.
दूषित पाण्यामुळे कृषी क्षेत्र धोक्यात आले आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ या भागातील जीन्स कारखान्यांना पाठबळ देत असल्याने तालुक्यातील कृषी क्षेत्र धोक्यात आले असल्याचे चित्र आहे. या धोकादायक झालेल्या कृषी क्षेत्राच्या बचावासाठी कोणी पुढाकार घेणार का? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
उल्हासनगर शहरातील वालधुनी नदीच्या काठावर असलेल्या जीन्स धुलाई कारखान्यांमुळे नदी प्रदूषित होत होती. या कारखान्यांवर हरित लवाद व उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली होती. यात शहरातील जीन्स कारखाने बंद पडले आहेत. मात्र या कारखान्यांनी ग्रामीण भागाचा आडोसा पकडून पुन्हा एकदा जीन्स धुलाई सुरू केली आहे. केडीएमसी क्षेत्रातील 27 गावांमध्ये असलेल्या माणेरे, द्वारलीत सर्वाधिक जीन्स कारखाने सुरू आहेत. कारखान्यातील पाणी थेट उघड्या नाल्यांत सोडले जाते. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी व जलप्रदूषण सुरू आहे. केडीएमसीच्या कारवाईनंतर या कारखान्यांवर बंदोबस्ताची गरज निर्माण झाली आहे.