

Bhiwandi youth arrested one sided love case
भिवंडी : भिवंडी शहराला हादरवून टाकणाऱ्या एका खळबळजनक खूनाच्या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तरुणाने ऑक्टोबर २०२४ मध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या केली होती. तब्बल १० महिन्यांनंतर आरोपी राजू महेंद्र सिंह (वय २४) याला पकडण्यात शांती नगर पोलिसांनी यश मिळवले. या संपूर्ण प्रकरणाचे गूढ त्याच्या हातावरील टॅटूमुळे उलगडले.
भिवंडीतील भादवड परिसरातील तरे चाळीत राहत असलेल्या नितू भानसिंग (वय२३) या तरुणीवर आरोपी राजू मागील दोन वर्षांपासून एकतर्फी प्रेम करत होता. त्याने नितूला अनेकदा लग्नाची मागणी घातली होती. मात्र, नितूने ठामपणे नकार दिला. एवढंच नव्हे तर तिचं लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर नितूने त्याच्याशी बोलणंही बंद केलं. या गोष्टीचा राग मनात धरून, दि. २८ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास राजूने नितूच्या घरी घुसून धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली.
नितूवर हल्ला होत असताना तिची लहान बहीण ऋतु घरी आली. तिने बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या आरोपीने तिच्यावरही वार केले. यात ऋतु गंभीर जखमी झाली होती. नितूला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु नीतूचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी राजू घटनास्थळावरून फरार झाला आणि पोलिसांना तब्बल दहा महिने चकवा देत होता.
घटनास्थळी जखमी झालेल्या ऋतूने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपीच्या हातावर टॅटू असल्याचं सांगितलं होते. हीच माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरली. काही दिवसांपूर्वी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजू इंदोर मध्ये ‘सुरज’ नावाने राहत असून नोकरी शोधत आहे. शांतीनगर पोलिसांनी इंदोर क्राईम ब्रांचच्या मदतीने सापळा रचला. राजूने स्वतःला सुरज असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातावरील टॅटूने त्याची खरी ओळख उघडकीस आली.
हत्या केल्यानंतर राजूने भिवंडी सोडून उत्तर प्रदेश, प्रयागराज, इंदौर अशा विविध भागांत आपलं नाव बदलून वास्तव्य केले. तो मोबाईल बंद ठेवायचा, नाव बदलून परिसरात हिंडायचा आणि सतत ठिकाणं बदलत राहायचा. यामुळे शांतीनगर पोलिसांना त्याला पकडणं अवघड जात होते. टॅटूमुळे ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. चौकशीत राजूने नितूच्या खुनाची कबुली दिली. त्याला आश्रय व मदत करणाऱ्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
नितू भानसिंगची निर्दयी हत्या आणि बहिणीवरचा हल्ला या घटनेमुळे संपूर्ण भिवंडी हादरली होती. तब्बल दहा महिन्यांनंतर आरोपी गजाआड झाल्याने पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. मात्र कुटुंबीयांनी असा एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.