

भिवंडी/टिटवाळा : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील खंडुपाडा येथील आदिवासी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले यंत्रमाग कारखान्यांवर अखेर पालिका प्रशासनाने हातोडा चालवला असून मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान खडवली परिसरात वाढत्या अनधिकृत बांधकामांवर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत चक्क चाळी आणि फाउंडेशनच्या पायाभूत संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या. ही कारवाई कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या स्पष्ट आदेशानुसार करण्यात आली असून, स्थानिक प्रशासनाची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
शहरातील मौजे निजामपूर येथील सर्व्हे क्रमांक 51/2 अ ही 30 गुंठे जमीन बायाबाई रामू गुणगुणे यांच्या मालकीची असून या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करीत यंत्रमाग कारखाने बनविले होते.याबाबत बायाबाई यांचा मुलगा राजू गुणगुणे यांनी पालिका प्रशासनाकडे 2016 मध्ये सर्वप्रथम तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. या जमिनीची मालकी गुणगुणे कुटुंबीयांची असल्याचा निवडा भिवंडी तहसीलदार यांनी 2018 मध्ये देत त्या जागेवरील अतिक्रमण हटवावे असे पालिकेस निर्देश दिले होते.तेव्हा पासून प्रत्येक वेळी टाळाटाळ होत असल्याने रेंगाळलेली कारवाई होण्यासाठी पालिकेच्या आयुक्त पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अनमोल सागर हे आल्यानंतर पुन्हा एकदा कारवाई करण्याची मागणी गुणगुणे कुटुंबीयांनी केल्यानंतर पालिकेनी ही कारवाई केली आहे.या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेले चार यंत्रमाग कारखाने जेसीबी च्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले आहेत.स्थानिक प्रभाव समिती क्रमांक एक चे सहाय्यक आयुक्त मकसूद शेख ,शहर विकास विभागाचे नियंत्रण अधिकारी अरविंद घोगरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या कर्मचार्यांनी ही कारवाई केली असून यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन अग्निशामक दलाची गाडी व एक रुग्णवाहिका यांसह शांतीनगर पोलिसांचा मोठा बंदोबस्त परीसरात तैनात करण्यात आला होता.
आम्ही दहा वर्षांहून अधिक काळ आमच्या हक्काच्या जमिनीसाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली झगडत होतो.पालिका प्रशासन प्रत्येक वेळी वेगवेगळी कारण देऊन तर कधी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई होत नव्हती.त्यामुळे आमची निराशा होत होती.अखेर आज कारवाई झाल्याने आम्हाला न्याय मिळाला असल्याने आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया राजू गुणगुणे यांनी दिली आहे .खडवली पूर्वेतील सर्वे नंबर 57/1अ व 57/2 या भूखंडांवर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार नितीन बोडके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची रचना करण्यात आली आणि कारवाईला सुरुवात झाली.कारवाई दरम्यान खडवली मंडळ अधिकारी दशैना भावे, खडवली ग्रामपंचायतचे प्रतिनिधी बेहेरे, महावितरणचे कर्मचारी, अग्निशमन दल, ग्राम महसूल अधिकारी तसेच टिटवाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे समन्वयाने सहकार्य लाभले.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही सात फाउंडेशन, जोते बांधकाम व चाळी हटवल्या असून ही मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. उर्वरित अनधिकृत बांधकामांवरही लवकरच कारवाई करण्यात येईल.
नितीन बोडके, नायब तहसीलदार
या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणार्यांमध्ये खळबळ उडाली असून, स्थानिक प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवायांचा इशारा दिला आहे. अशी कारवाई सातत्याने केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा कारवाई सुरू राहणार आहे.
अतुल झेंडे, पोलिस उपायुक्त