.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Bhiwandi Builder Attack
भिवंडी : भिवंडी शहरात एक गुन्हेगारीची भीतीदायक घटना समोर आली असून शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत उशिरा रात्री एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. किरकोळ संशयातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेत व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. कमरूजमा मोहम्मद शब्बीर शेख असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू आजादनगर येथील कमरूजमा मोहम्मद शब्बीर शेख (वय ३८) मध्यरात्री सुमारे १.३० वाजता काम उरकून दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी निजामी हॉटेलसमोर पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले.बोरिंगचे सामान चोरी केल्याच्या संशयावरून आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत मारहाण सुरू केली.
यावेळी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली.या हल्ल्यात शेख यांचे दोन्ही हात पाय फ्रॅक्चर झाले असून डोकं,पाठ आणि पोटावर गंभीर दुखापती झाल्या आहेत.जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात कबरूद्दीन सिद्दीकी, अफसार सिद्दीकी, इमरान अन्सारी, शहनवाज सिद्दीकी आणि आलम शेख यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून पोलिसां कडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.