

बदलापूर : तीन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला असून बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सोमवारी दुपारपासून बारवी धरणातून मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लो सुरू झाला असून एमआयडीसी प्रशासन आणि बारवी धरण प्रशासनाने पाणलोट क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बारवी धरण 9 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यानंतरही पाऊस सुरूच होता. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाने पुन्हा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे बारवी धरण पुन्हा एकदा ओव्हर फ्लो झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत पडणार्या पावसामुळे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे ठाणे जिल्ह्याला पुढील वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान परतीच्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी शेतीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. बदलापूर ग्रामीण परिसरात अनेकांनी लावलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकर्यांनी कापून ठेवलेला भात आता वाया जाण्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शेतकर्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी सोमवारीच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.