

अंबरनाथ : शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व विविध कामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवरून दररोज अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. हे अपघाती खड्डे त्वरित बुजविण्यासाठी अंबरनाथ शहरातील रिक्षाचालकांनी अंबरनाथ नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. येत्या काही दिवसात हे खड्डे बुजवले न गेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील रिक्षाचालकांनी दिला आहे.
शहराच्या पूर्व व पश्चिम भागातील नादुरुस्त रस्ते तसेच रिक्षा चालकांना भेडसावणार्या समस्या दूर करण्याची मागणी करूनही नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील जोशी आणि रामदास पाटील रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अंबरनाथ नगरपालिका कार्यालयावर धडक देऊन निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी कुमार मुदलियार यांच्यासह रिक्षा चालक - मालक उपस्थित होते.
शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करा या आणि इतर मागण्यांसाठी पालिकेशी वारंवार पाठपुरावा केला होता पण अधिकार्यांकडून आश्वासने देण्यात आली. खराब रस्त्यांमुळे रिक्षा नादुरुस्त होऊन त्याच्या दुरुस्तीचा फटका चालकांना बसत असल्याचे रिक्षा युनियनचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सांगितले. तर तत्काळ रस्ता दुरुस्तीचे काम करणार असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.