

Sexual assault attempt
डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे मोहने-गाळेगाव परिसरात एका 15 वर्षीय गतिमंद मुलीवर अतीप्रसंगाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे. सुनील पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मोहने-गाळेगावात आपल्या कुटुंबासोबत राहणारी मुलगी गतिमंद आहे. ही मुलगी बुधवारी दुपारच्या सुमारास अंगणात खेळत असताना तिच्यावर सुनील पवार या नराधमाची नजर पडली. त्याने या मुलीला स्वतःच्या घरात बोलवून दार बंद केले. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे केले.
बराच वेळ झाला तरी मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. अखेर ही मुलगी सुनीलच्या घरात आढळून आली. सुनील तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु कुटुंबीय वेळेत पोहोचल्याने मुलीवरील अनर्थ टळला. भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर मुलीसह तिच्या घरच्यांनी तालुका पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून सुनील पवार याला अटक केली आहे. गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.