

ठाणे : हे ज्येष्ठ नागरिक येथे सापडले आहेत... पण त्यांना त्यांचे नाव-पत्ता सांगता येत नाही... आपल्या समाज माध्यमांच्या ग्रुपवर हा संदेश पुढे पाठवा... असे संदेश आजकाल अनेक समाजमाध्यमांवर फिरतात. त्यातून पोलिस यंत्रणा, समाजसेवी संस्थांना ज्येष्ठांच्या घरची वाट गवसते... पण स्मृतिभ्रंशामुळे अशी घरची वाट विसरलेल्या अनेक ज्येष्ठांच्या नशिबी हे भाग्य येतेच असं नाही...
पोलिस खात्याच्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 च्या कालावधीत सुमारे 68 हजार 616 विविध वयोगटातील स्त्री - पुरुष बेपत्ता झाले आहेत. त्यात ज्येष्ठांचे हे प्रमाण 4,427 इतके आहे. या हरवलेल्या ज्येष्ठांमध्ये स्मृतिभ्रंशामुळे घरची वाट चुकणार्या ज्येष्ठांचं प्रमाण लक्षणीय आहे, असं सामाजिक संस्थांचे निरीक्षण आहे.
वाढते वयोमान, बदलती जीवनशैली आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ज्येष्ठांच्या एकाकीपणात वाढ होत असल्याने देशात ज्येष्ठांच्या एकाकीपणात अधिकच भर पडते आहे. ज्येष्ठांचे विविध संघ, कट्टे या मन रमण्याच्या जागाही आता मोठ्या प्रमाणावर आकार घेत असल्या तरी त्यातून काही तासांची सोबत किंवा विरंगुळा ज्येष्ठांना मिळतो.
पण अनेकदा घरातील नव्या पिढीशी जुळवून न घेता आल्याने किंवा जीवनसाथीच्या वियोगाने आलेले एकटेपणा अनेकांना सहन होत नाही, त्यातून जबाबादार्या नसल्याने मन, मेंदू आणि शरीर कार्यरत नसल्याने अनेकांना स्मृतिभ्रंशासारखा आजार वयाच्या साठीतही घेरतो. कोरोनानंतर ही स्मृतिभ्रंशाची छाया अधिकच गडद झाली आहे.
हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांपैकी 10 टक्के ज्येष्ठ परत सापडतात. हरवलेल्या बहुतांशी ज्येष्ठांना स्मृतिभ्रंशासारख्या आजार असतो. त्यामुळे अशा ज्येष्ठांचा शोध घेणे हे पोलिसांपुढचे आव्हान असते. तसेच ज्येष्ठांना शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत नाही. ज्येष्ठांच्या शोधासाठी कौटुंबिक पातळीवर आणि यंत्रणांच्या पातळीवर असलेल्या उदासीनतेमुळे हरवलेल्या ज्येष्ठांच्या घराच्या परतीची वाट अवघड होऊन बसते.
शैलैश मिश्रा, संस्थापक, सिल्व्हर इनिंग फाऊंडेशन, नाशिक.