

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना कल्याणच्या खाडी किनारी केली. शिवरायांच्या या द्रष्टेपणाची नव्या पिढीला ओळख होण्याच्या उद्देशाने कल्याणच्या याच खाडीकिनारी भव्य नौदल संग्रहालयाचे (NAVAL MUSEUM) सुरू असलेले काम आता अंतिम टप्प्यात आले. मात्र याच शेजारी उभारण्यात आलेल्या अजस्त्र होर्डींग्जमुळे नौदल संग्रहालयाचे केवळ विद्रुपीकरणच होत नाही, तर घाटकोपरसारखी होर्डींग्ज दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नौदल संग्रहालयाचे उद्घाटन होण्यापूर्वी हे अजस्त्र होर्डींग्ज तेथून हटविण्याची मागणी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता असल्याने हे होर्डींग्ज लोकार्पणापूर्वी हटविले नाही तर आम्ही ते तोडून टाकू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आहे.
ऐतिहासिक काळात कल्याणच्या खाडीचे असलेले सामरीक आणि भौगोलिक महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याजवळ खाडीकिनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली. त्याच ठिकाणी महाराजांच्या या दूरदृष्टीला आणि शौर्याला साजेसे एखादे स्मारक उभारण्यात यावे, अशी तमाम शिवप्रेमी आणि कल्याण-डोंबिवलीकरांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती. या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला नितांत आदर आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भारतीय नौदलाच्या मदतीने आधुनिक नौदल संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडली. तसेच ती पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती शासकीय कार्यवाही डॉ. सूर्यवंशी यांनी लक्षपूर्वक पूर्ण केली. ज्याची फलश्रुती म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यात त्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पाणबुडीच्या आकाराच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारण्यात येत आहे.
नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना दुसरीकडे याचशेजारी अतिशय अजस्त्र असे भलेमोठे होर्डींग्ज उभे राहिले आहे. ज्यामुळे या नौदल संग्रहालय आणि परिसराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण होत आहे. एकीकडे दुर्गा देवीचे मंदिर, त्याच्या पायथ्याशी उभी असलेल्या टी - 80 युद्ध नौकेसमोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि या तिन्ही महत्त्वाच्या वास्तूंच्या सान्निध्यात उभे राहत असलेले हे नौदल संग्रहालय, अशी या संपूर्ण परिसराची भौगोलिक स्थिती पाहता नौदल संग्रहालयाशेजारी असलेले अजस्त्र होर्डींग्ज म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूवरील काळा डाग असल्याचे मानले जाते. या अवाढव्य होर्डींग्जखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संग्रहालय झाकोळून जाणार आहे. परिणामी हे होर्डींग्ज येथून हटविण्याची मागणी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेले कल्याणातील पहिले आरमार हे आमच्यासह सर्वच शिवप्रेमींसाठी स्वाभिमान आणि आमचा अभिमान आहे. या आरमाराच्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या नौदल संग्रहालयासाठी आमच्या मनामध्ये नितांत आदर असून त्याची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही. एकीकडे शिवसेनेचे नेते सांगतात की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. तथापी दुसरीकडे त्यांच्याच राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अशा पद्धतीने विटंबना करायची ही दुतोंडी भूमिका आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने हे अवाढव्य होर्डींग्ज स्वतःहून हटवावे, अन्यथा आम्हीच ते तोडून टाकू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला. दरम्यान यासंदर्भात केडीएमसी प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे समस्त शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या नजरा लागल्या आहेत.