

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील बेतूरकर पाडा परिसरात शुक्रवारी (दि.25) भरदिवसा एका तरूणीचा पाठलाग करत तिची छेड काढल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच मनसेच्या शहराध्यक्षा कस्तुरी देसाई यांच्यासह संतप्त रहिवाशांनी रोडरोमिओला पकडून यथेच्छ धुलाई केल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक तरूण शुक्रवारी दुपारच्या सुमारास बेतूरकरपाडा परिसरात दबा धरून थांबला होता. रस्त्याने एक तरूणी पायी जात असताना दबा धरून थांबलेल्या बदमाशाने पाठलाग सुरू केला. आपला कुणीतरी पाठलाग करत असल्याचे जाणवताच तरूणीने चालण्याचा वेग वाढवला. मात्र तरीही हा बदमाश तरूणीचा पिच्छा सोडत नव्हता. अखेर ही तरूणी थांबल्यानंतर बदमाशाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तरूणीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील पादचाऱ्यांनी दखल घेतली आणि तत्काळ हस्तक्षेप केला. ही माहिती मनसेच्या कल्याण शहराध्यक्षा कस्तुरी देसाई यांना मिळताच त्यांनी तरूणाला रोखले. त्याला संतप्त नागरिकांनी पकडून भरचौकात चोप दिला. त्यानंतर या बदमाशाला पुढील कार्यवाहीसाठी बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकारामुळे परिसरातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशा घटनांवर तत्काळ कारवाईची आवश्यकता असल्याचे या भागातील महिलांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे मत मनसेच्या शहराध्यक्षा कस्तुरी देसाई यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केले.