

ठाणे : ठाणे शहरात तसेच खाडीच्या पलिकडे नव्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असताना या बांधकामांना अभय देणार्या ठाणे महापालिकेला 17 वर्ष जुन्या असलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची जाग आली आहे.
ठाण्यातील यशस्वी नगर भागात असलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पालिकेच्या कारवाईला विरोध करत दोन महिलांनी आत्मदहन करण्याचा प्रयन्त देखील केला आहे. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको आम्हाला हक्काचा निवारा द्या, अशी मागणी महिला रहिवाशांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात येत असलेल्या यशस्वी नगर परिसरात साई दर्शन ही अनधिकृत इमारत असून ही इमारत 17 वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. मात्र ही इमारत अनधिकृत असल्याचे ठरवत नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. नोटीस दिल्यानंतरही नागरिकांनी घरे खाली न केल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेऊन महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करण्यासाठी पोचल्यानंतर पालिकेच्या कारवाईला नागरिकांनी जोरदार विरोध केला. मोठ्या प्रमाणात रहिवाशी इमारतीच्या खाली उतरून पालिकेच्या कारवाई विरोध करू लागले. कारवाईला विरोध करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात आघाडीवर होत्या. याच दरम्यान, दोन महिलांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल आणि पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला..
आम्हाला पालिकेची कोणत्याच प्रकारची नोटीस मिळाली नसून घरे खाली न करण्याची भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. मुलांच्या दहावी बारावीच्या परीक्षा असताना आम्हाला बेघर का करता ? असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. तर जेव्हा आम्ही घरे घेतली तेव्हा राष्ट्रीयकृत बँकांकडून आम्हाला गृह कर्ज देखील मिळाले आहे. पालिकेला कारवाईच करायची होती तर त्याच वेळी कारवाई का नाही केली, असा प्रश्न रहिवासी महिलांनी उपस्थित केला आहे. आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको मात्र आम्हाला बेघर न करता हक्काचा निवारा द्या, असा आक्रोश यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने या महिलांनी केला.