मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये काशीमिरा येथील एका बारमधील मुली डान्स करत असल्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या बारवर धाड टाकत 13 डान्सर मुलींसह 13 आरोपींना अटक करत 35 हजार 500 रुपये जप्त केले आहे. या कारवाईत चालक मालक हे फरार असल्याचे समजते.
लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करत रात्रभर डान्स बारमध्ये डान्स सुरू असल्याचे आढळून आल्यामुळे काशीमिरा पोलिसांनी कारवाई करत 21 जणांना अटक केले होती. हा ऑर्केस्ट्रा बार बेकायदा असल्यामुळे तत्कालीन पालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आला होता. मात्र पुन्हा सहायक आयुक्तांनी दुरुस्ती परवानगी दिल्यामुळे पुन्हा त्या बारचे बांधकाम करण्यात आले असून यामध्ये पुन्हा डान्सबार सुरू केला आहे.
या डान्स बारमध्ये सोमवारी रात्री 12 वाजता छापा टाकला. त्यावेळी ऑर्केस्ट्रा बारचे चालक, मालक, कॅशिअर, मॅनेजर, स्टिवर्ड, वेटर, वादक व पुरुष सिंगर यांनी आपआपसात संगनमत करून ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी 13 मुली या तोकडे अश्लिल नृत्य करत असताना यावेळी आढळून आल्या. दरम्यान शासनाने मंजूर केलेल्या परवान्याचे उल्लंघन करून नियमापेक्षा जास्त मुली सिंगर कम डान्सर या बारमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
त्यामुळे ऑर्केस्ट्रा बारचे दोन मॅनेजर, एक कॅशिअर, चार स्टिवर्ड, तीन वेटर, दोन वादक, एक पुरुष सिंगर आणि 13 महिला सिंगर कम डान्सर असे एकूण 26 जण व 35 हजार 500 रुपये मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली आहे.
रात्रीच्या वेळ असल्याने 13 मुलींना मंगळवारी (दि.8) सकाळी काशिमिरा पोलीस ठाणे येथे हजर राहण्याची समज देऊ न सोडून देण्यात आले आहे. याबाबत ताब्यात घेतलेले आणि आरोपी चालक, मालक आणि तपासात निष्पन्न होणारे इतर आरोपी यांच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.