

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने गावातील एका घरात घरगुती गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बसवत असताना त्यातून गॅस गळती झाली. यावेळी स्फोट आणि आगीचा भडका उडून घरातील दोन जण होरपळले होते. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमींवर मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन्ही जखमींचा मृत्यू झाला आहे.
त्रिशा पवन पारवे (9, रा. तांडेल इमारत, महात्मा फुले नगर, मोहने) आणि विजय गणपत तांडेल (53, रा. मोहने ) अशी मृतांची नावे आहेत. या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात या दोन्ही मृत्यु प्रकरणाच्या नोंदी दाखल केल्या आहेत. मोहन्यातील महात्मा फुले नगरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी सकाळी एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली होती. यात घराचे मोठे नुकसान झाले.
वैशाली तांडेल यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचे पती सकाळी साडेसात वाजता शेजारी राहणाऱ्या अनिता पारवे यांच्या घरगुती गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बसविण्यासाठी गेले होते. रेग्युलेटर बसवून गॅस सुरू केला असता गॅस घरात सर्वत्र पसरून भडका उडाला. आगीच्या भडक्यात कुटुंबप्रमुख अनिता पारवे, त्यांची मुलगी आणि विजय तांडेल हे तिघे गंभीररित्या होरपळले. शेजारच्या रहिवाशांनी विजय तांडेल यांना केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात तात्काळ दाखल केले. त्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्याची सूचना केली. त्यानुसार विजय यांच्यावर घटना घडल्यापासून उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती नंतर खालावली.
शुक्रवारी 7 मार्च रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याच घटनेत गंभीर जखमी झालेली त्रिशा पवन पारवे (9) हिच्यावर देखिल लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्रिशाचा गुरूवारी, दि. 13 मार्च रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी मृत त्रिशाचे वडिल पवन पारवे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात जाऊन आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.