

कसारा/ माणगाव : मुंबई-नाशिक मार्गावर कसारा घाटात बीएमडब्ल्यू कारमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कार पूर्ण जाळून खाक झाली. तर दुसर्या घटनेत दिघी ते मुळशी मार्गावर प्रवास करत असलेल्या पर्यटकांच्या जॅग्वार कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या दोन्ही घटना दुपारच्या सुमारास घडल्या. सुदैवाने यातील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
उन्हाळ्यात चारचाकी वाहनांना आग लागण्याचे व बंद पडण्याच्या घटना जास्त घडतात. तेव्हा कार मालकांनो, उन्हाळ्यात थोडे सतर्क राहा. कुलिंग लेव्हल व तापमान याची नियमित तपासणी करा. इंजिन प्रमाणापेक्षा अधिक गरम होत असेल, तर पुढचा धोका ओळखून तत्काळ त्याची दुरुस्ती केल्यास अशा घटना आटोक्यात येतील.
मुंबई-नाशिक महामार्गावरून आपल्या बीएमडब्लू कारने शिर्डीकडे चाललेले चालक आदित्य प्रकाश चौरे (वय 25) रा. कल्याण व त्यासोबत असलेले दोघे आपल्या कारने प्रवास करत होते. लाहे फाटा येथे अचानक गाडीच्या इंजिनमध्ये अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे लक्षात आले. प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याचे बाजूला थांबवली व गाडीतील सर्वजण बाहेर पडले. त्याचदरम्यान गाडीने पूर्णपणे पेट घेतला. कारमधून स्फोट होण्याचे आवाज येऊ लागले. सुरक्षिततेच्या कारणामुळे काही वेळ मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
दुसर्या घटनेत दिघी ते मुळशी मार्गावर प्रवास करत असलेल्या पर्यटकांच्या जग्वार कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुनील पवार राहणार ताथोडे, मुळशी पुणे हे त्यांची पत्नी व 3 मुलीसह हे आपल्या जॅग्वार कारने दिघी ते मुळशी पुणे असा प्रवास करीत असताना चांदोरे गावचे हद्दीत अन्नपूर्णा हॉटेल समोरून जात असताना त्यांचे जग्वार कारने अचानक पेट घेतला. ही घटना सुनील पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कार रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीतून पाचही पर्यटक प्रवासी उतरले. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यानच्या काळात या मार्गावरील प्रवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे दोन्ही दिशेने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
वाहनातील वायरिंगमध्ये दोष निर्माण झाल्यावर त्यात शॉर्टसर्किट निर्माण होऊनही आग लागते. वाहनातील कुलिंग सिस्टीमही महत्त्वाची आहे. इंजिनाचे तापमान 83 डिग्रीच्या पुढे गेल्यास आग लागण्याचा धोका वाढतो. कुलिंग पाईप लिकेज असेल, वॉटर पंप काम करत नसेल, तर वाहने पेटण्याचा धोका जास्त असतो.
वाहने पेटू नये म्हणून सर्वात आधी रेडिएटर फॅन सुस्थितीत आहे का ते पाहा, रेडिएटर जाम झाल्यास त्याची स्वच्छता आवश्यक आहे. एयर फिल्टर, एसी फिल्टर स्वच्छ करून घेणे. टायरमध्ये शक्यतो नायट्रोजन भरून घ्या. त्यामुळे टायर तापत नाही.