ठाणे : रस्त्यावरून पायी जात असताना पाचव्या मजल्यावरून अंगावर श्वान पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.६) रोजी दुपारी मुंब्रा परिसरात घडली आहे. हा श्वान पडल्यानंतर या चिमुकलीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून संबंधित व्यक्तींकडे श्वान पाळण्याची परवानगी होती का? याबाबत पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून अशाप्रकारे चिमुकलीचा अंत झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंब्र्यातील अमृत नगर परीसरातील रस्त्यावरून सना बानो ही चार वर्षाची चिमुकली मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आईसोबत पायी चालली होती. त्यावेळी चिराग मेन्शनया इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन सनाच्या अंगावर लॅब्रेडॉर प्रजातीचा पाळीव श्वान तिच्या अंगावर पडला. यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात आणि नंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डाँक्टरांनी तिची तपासणी करून ती मृत झाल्याचे घोषित केले. तिच्या आईने घडलेल्या प्रकरणाबाबत कुणावरही संशय अगर कुणाच्याही विरोधात तक्रार नसल्याचा जवाब पोलिसांना दिला आहे. या घटनेत हा श्वानही जखमी झाला असून,प्राणी मित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.ज्या कुटुंबाने हा श्वान पाळला होता त्यांच्याकडे तो पाळण्याचा परवाना होता का? याबाबत तपास करुन पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना ठामपाच्या संबधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.