मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरातून मालदीव येथे नोकरीसाठी गेलेला तरुण मन पारेख हा आठ महिन्यांपासून मालदीवमध्ये अडकला होता. मिरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलच्या मदतीने मन पारेख हा सुखरूप मायदेशी परतला आहे. भाईंदर येथे राहणारा मन पारेख (24) हा व्यवसायाने शेफ असून मालदीव येथील रिसॉर्टमध्ये तो एजंटच्या माध्यमातून डिसेंबर 2023 मध्ये नोकरीसाठी गेला होता.
दोन महिन्यांच्या नोकरीत मालदीव येथील रिसॉर्ट मालक व तेथील जनरल मॅनेजर यांनी त्याच्याकडून 18 ते 20 तास सतत काम करवून घेतले व पगारही दिला नाही. तसेच त्याला जेवणही निकृष्ट दर्जाचे देत होते. तेथील जेवणामुळे त्याला त्रास होऊन त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. त्यामुळे त्या ठिकाणच्या रिसॉर्ट येथे चांगल्या सोयी सुविधा नसल्याने त्याने परत भारतात येण्याचे ठरवले; परंतु हॉटेल मालक हा त्याला सोडायला तयार नव्हता. मन पारेख हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असून कॉन्ट्रॅक्ट पूर्ण न केल्याबद्दल मागतील तेवढे पैसे देवून रिसॉर्ट मालकाला मन पारेखला पुन्हा भारतात पाठवण्याची त्यांना विनंती केली, परंतु मालकाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याची आई गेल्या 6 महिन्यांपासून त्याला भारतात परत आणण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होती. मन पारेखच्या आईने भरोसा सेल येथे 15 नोव्हेंबर रोजी रिसॉर्ट मालकाविरोधात तक्रारी अर्ज दिला. त्यानंतर त्याला 17 नोव्हेंबर रोजी मालकाने भारतामध्ये पाठवण्याची तयारी दाखवली. 18 नोव्हेंबर रोजी मन पारेख हा भारतात सुखरूप परतला आहे.