डोंबिवली : खासगी क्लास चालकाने एका सहा वर्षाच्या मुलीला अभ्यासात ‘ढ’ संबोधून रागाच्या भरात मारहाण केली. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या सांगाव चेरानगर भागात घडली.
मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असूनही तिला समजून सांगण्याऐवजी खासगी क्लास चालकाने आपल्या मुलीला मारहाण केल्याचा आरोप करत मुलीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शिक्षकेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगाव (चेरानगर) मधील सोसायटी परिसरात हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे. क्लास शिक्षिका घरात लहान मुलांचे वर्ग घेते. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नितीन नरूटे यांची सहा वर्षाची मुलगी दररोज सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वेळेत क्लासमध्ये असते. गुरुवारी सकाळी ती क्लासमध्ये अभ्यास करत असताना शिक्षिकेने तिला दिलेला अभ्यास पूर्ण केला नाही, यावरून दमदाटी केली. तुला अभ्यास का जमत नाही? असे दरडावून विचारत विद्यार्थीनीच्या हातावर छड्या मारल्या. तसेच तिच्या कानशिलात देखील भडकावली. या प्रकारामुळे विद्यार्थीनी रडायला लागली. क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांसमोर शिक्षिकेने मारल्याने मुलगी अस्वस्थ झाली. क्लासमध्ये घडलेला प्रकार मुलीने घरी गेल्यानंतर आई-वडिलांना सांगितला असता पालकांनी क्लासमध्ये जाऊन चालिकेला जाब विचारला. मुलीला अभ्यास समजून सांगण्याऐवजी तिला मारहाण का केली? असा जाब विचारून पालकांनी तक्रार दाखल केली आहे.