पालघर : काही फुटाच्या प्लास्टिकच्या मेणकापडावरून झालेल्या वादात एका 58 वर्षीय व्यक्तीला मारहाण करून ठार केल्याची घटना घोलवड पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये घडली आहे. गजानन दवणे असे मारहाण करून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांना गजाआड केले आहे.
घोलवड पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये झाई मांगेलवाडा परिसरात गजानन दवणे यांचे घर असून ते आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारी प्रकाश दवणे याचे घर आहे. या दोन्ही घरांमध्ये एक अरुंद रस्ता असून या रस्त्यावरून दोन्ही दवणे कुटुंबीयात वादविवाद आहेत.
सध्या पावसाळ्यामुळे घरात पावसाचे पाणी येऊ नये यासाठी प्रकाश व गोविंद विष्णू दवणे यांनी आपल्या घरावर प्लास्टिक सदृश्य मेणकापड टाकले होते. मात्र या मेणकपडाचे पाणी अरुंद रस्त्यावर पडत असल्याने हे मेणकापड हटवण्यासाठी गजानन दवणे यांनी प्रकाश व गोविंद दवणे यांना म्हटले होते. मेनकापड हटवण्याच्या वादातून दोन्ही दवणे कुटुंबीयात शुक्रवारी वादावादी व भांडणे झाली. या वादाचा राग मनात ठेवून प्रकाश दवणे, गोविंद दवणे, सविता उर्फ सरस दवणे यांनी गजानन दवणे यांना जोरदार मारहाण केली.
तिघांनी केलेल्या जबर मारहाणींमुळे दवणे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर गजानन दवणे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दवणे यांचा मुलगा गणेश दवणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून प्रकाश, गोविंद व सविता यांना पोलिसांनी शनिवारी अटक केली.