भिवंडी : शहरातील कामतघर परिसरातील 50 वर्षीय महिला तिच्या दोन मुलींसह राहत्या घरात झोपलेली असताना महिलेच्या ओळखीतील तरुणाने रात्रीच्या सुमारास येत महिलेचा विनयभंग करीत तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.9) रात्रीच्या सुमारास घडली.
याप्रकरणी महिलेच्या फिर्यादी वरून तरुणाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी भोईर (रा. कासार वडवली, ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कामतघर येथे एका इमारतीच्या सदनिकेत 50 वर्षीय महिला तिच्या दोन मुलींसोबत राहते. दरम्यान बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी पीडित महिला मुलींसोबत घरी झोपलेली असताना रात्री 3 वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी आरोपीने महिलेसोबत अश्लिल वर्तन करून शिवीगाळ करीत पीडितेला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तरुणाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील करीत आहेत.