

ठाणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. असे असले तरी अशिक्षित आई-वडील, घरची बिकट परिस्थिती अशा विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहतात. मात्र, शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येणार्या 6 ते 14 वयोगटांतील शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणामुळे यंदा जिल्ह्यातील 578 मुलांच्या हाती पाटी-पेन्सिल आल्याचे सकारात्मक चित्र आहे.
जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. त्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबविली जाते. यात जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, महसूल विभाग अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून विविध कारणांमुळे शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जातो.
ठाणे 241
नवी मुंबई 68
मिरा-भाईंदर 96
भिवंडी 46
उल्हासनगर 27
केडीएमसी 29
एकूण 507
विशेषतः कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले स्थलांतर, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगारांची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, सिग्नलवरील भीक मागणारी बालके अशा सर्वच ठिकाणी मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळच्या शाळेत, तर काही बाबतीत शासकीय वसतिगृहे अशा ठिकाणी ठेवून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. यंदा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात जुलै ते सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 1578शाळाबाह्य बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 71 तर महापालिका क्षेत्य्रातील 507 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कल्याण 07
अंबरनाथ 00
भिवंडी 03
मुरबाड 05
शहापूर 56
एकूण 71
6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी प्रोत्साहित केले जात असून, ही मोहीम प्रभावी ठरत आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले जात असून, ज्या ठिकाणी अधिक गळती अथवा शिक्षणाविषयी अनास्थाआहे अश्या समाज घटकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद ठाणे