भिवंडी : भिवंडी शहरात गुन्हे शाखेने महामार्गावर कारवाई करीत 2 कोटी 87 लाख 61 हजार 680 रुपयांचा 553 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
भिवंडी शहरात गांजा चरस एमडी या अमली पदार्थांचा वापर वाढला असून भिवंडी शहरात मागील काही दिवसांपासून गांजा चरस एमडी यांचे साठे आढळून येत असल्याचे दिसून येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-नाशिक महामार्गावर काही व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल आव्हाड यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने महामार्गावर राजनोली नाका परिसरातील पाईपलाईन रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केली.
या कारवाईत पतीराम पंगी उर्फ सुरज (वय 38 वर्षे), अर्जुन लचना शेट्टी, (वय 20 वर्षे, दोघे रा. कोरापूर, ओरिसा, अमीन बाबु सैय्यद, (वय 39 वर्षे, रा. नांदेड, सलीम गुलामनबी शेख, (वय 30 वर्षे. रा. छत्रपती), इमरान हाजी अहमद शेख, (वय 36 वर्षे), रमजान वकील अहमद अन्सारी, (वय 25 वर्षे), नाजीम हाफीज फराद अन्सारी, (वय 47 वर्षे, रा. भिवंडी), अमित ऊर्फ किरण रंगराव सोनोने, (वय 35 वर्षे, रा. बापगांव, ता. भिवंडी, मार्केस मार्टीन म्हस्के, (वय 36 वर्षे, रा.विठ्ठलवाडी), उल्हासनगर अशा नऊ आरोपींना या दरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओरिसा येथील आरोपी पती राम पंगी ऊ र्फ सुरज, अर्जुन लचना शेड्डी, अमीन बाबु सैय्यद यांनी ओरीसा येथून गांजा हा अमली पदार्थ ताब्यात घेऊन भिवंडी येथे सलीम गुलामनबी शेख, इमरान हाजी अहमद शेख, रमजान वकील अहमद अन्सारी यांच्या ताब्यात दिला. यावेळी घटनास्थळी नाजीम हाफीज फराद अन्सारी, अमित उर्फ किरण रंगराव सोनोने, मार्कस मार्टीन म्हस्के हे आरोपी गांजाचा माल खरेदी करण्यासाठी आले होते. या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्या जवळील मोबाईल रोख रक्कम व 553 किलो 600 ग्रॅम गांजा असा एकूण 2 कोटी 87 लाख 61 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या सर्व आरोपींविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अमोल इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार हे करीत आहेत.