

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या सर्वात महत्त्वाचा उत्पन्नाचा स्तोत्र असलेल्या मालमत्ता कर विभागातील कर्मचार्यांच्या कामात सुधारणा करण्याबाबत आयुक्त विकास ढाकणे यांनी मनावर घेतले आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी कर्मचार्यांची कर आकारणी, कर संकलन याबद्दलची बौध्दीक पातळी, काम करण्याची कार्यक्षमता व वसुलीच्या उदिष्टांच्या पुर्ततेसाठी कर्मचार्यांची चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. यामुळे वशिलेबाजांचा विभागातून पत्ता कट होऊन गुणवत्ता असलेले व हुशार कर्मचारी परिक्षेतून 50 टक्के मिळवत यश संपादन करून या विभागात नियुक्ती मिळवू शकतील.
दिवसेंदिवस तेच कर्मचारी त्याच विभागामध्ये काम करत असल्याचे महापालिकेत दिसून येते. त्यामुळे त्यांची बदली अन्य विभागात होणे आवश्यक आहे. अकार्यक्षम कर्मचार्यांच्या बदल्यामुळे रिक्त होणार्या पदान्वये महापालिकेतीलच इतर कर्मचार्यांची बदली करावी लागेल असे कर्मचारी देखील कर विभागात काम करण्यास पात्र ठरण्याकरीता कर विषयक ज्ञानाची परीक्षा घेऊन अश्या कर्मचार्यांच्या गुणानुक्रमे येणार्या यादीनुसार सर्वोच्च गुण मिळवणार्या कर्मचार्यांची मालमत्ता कर विभागात बदली सर्वात प्रथम केली जाईल. व त्यानंतर दुसरा, तिसरा या प्रमाणे आवश्यक त्या बदल्या केल्या जातील.
आवश्यक बदल्याच्या नंतर उर्वरीत यादी प्रतिक्षा यादी म्हणून राखीव ठेवली जाईल व आवश्यकतेनुसार त्यातील कर्मचारी कर विभागाकडे पुरविले जातील. तसेच इतर विभागातून कर विभागाकडे बदलीने जाण्यासाठी परीक्षेसाठी पात्रता कोणत्याही विषयाचा पदवीधर व महापालिकेच्या सेवेत किमान पाच वर्षाचा अनुभव अशी निश्चित करण्यात आली आहे.
इतर विभागातील जे कर्मचारी किमान 50% गुण प्राप्त करतील किंवा त्यापेक्षा गुण प्राप्त करतील त्या गुणवत्ता क्रमांकानुसार मालमत्ता कर विभागात नियुक्ती दिली जाईल. सदर परीक्षा ही 100 गुणाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांची असेल, तसेच सदर परीक्षेमध्ये सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नांचे गुण वजा करण्यात येतील असे नमूद करण्यात आले आहे. उल्हासनगर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकार्यांना परीक्षेची कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त ढाकणे यांनी दिले आहेत.
मालमत्ता कर विभागातील सर्व कर्मचार्यांची तसेच महापालिकेतील इच्छुक लिपीक संवर्गातील कर्मचार्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील मालमत्ता कराशी निगडीत कलमे व नियम याचे विशेष प्रशिक्षण व सामान्य बौध्दीक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेकरिता विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन सत्र हे 5 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता महासभा सभागृह येथे होणार आहे.
10 डिसेंबर रोजी 11.30 ते 12.30 महासभा सभागृह येथे मालमत्ता कर विषयी चाचणी परीक्षा होणार आहे. मालमत्ता कर विभागात सध्या कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना देखील सदर चाचणी परिक्षा देणे बंधनकारक राहील. जे कर्मचारी किमान 50 टक्के गुण लेखी परिक्षेत प्राप्त करतील त्यांनाच कर आकारणी व कर संकलन विभागात कार्यरत ठेवण्यात येतील. अन्यथा त्यांची बदली इतरत्र कोणत्याही खात्यात करण्यात येईल असे कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.