

वसई : नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील कचरा भूमी आणि सांडपाण्याच्या आरक्षित जागांवर 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या होत्या. नालासोपारा येथील या अनधिकृत इमारतींवरील कारवाई शुक्रवारी (दि.14) रोजी संपुष्टात आली. गेल्या जानेवारी महिन्यापासून पालिकेने 22 दिवस कारवाई करून सर्व 41 इमारती जमीनदोस्त केल्या.
नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील कचरा भूमी आणि सांडपाण्याच्या आरक्षित जागांवर 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या होत्या. या 41 इमारती पाडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पालिकेने पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर-2024 मध्ये 7 दिवस कारवाई करून 7 धोकादायक इमारतींचे बांधकाम पाडण्यात आले होते. त्यानंतर मध्यंतरी रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने ही कारवाई काळ थांबली होती.
त्यांनतर बांधकाम पाडण्याच्या दुसऱ्या टप्प्यात गेल्या महिन्यात 23 जानेवारी पासून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. या कामामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी मनाई आदेश लागू केला होता. त्यासाठी तब्बल 500 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे 22 दिवस ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यासाठी येथील नागरिकांची समजूत काढण्यात पालिकेसह पोलीसांना कसरत करावी लागली. त्यानंतर शुक्रवारी (दि.14) रोजी संध्याकाळी कारवाई संपुष्टात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त दिपक सावंत यांनी दिली आहे. या इमारतींच्या बांधकाम पाडल्यामुळे दोन हजारांहून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.