

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील प्रीमिअर काॅलनी वसाहतीमध्ये एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या नोकरदाराची एका अनोळखी महिलेने बिटकाॅईनमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून 21 लाख 99 हजार रूपयांची फसवणूक केली आहे.
गेल्या महिनाभराच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या नोकरदाराने या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये घरी असताना आपणास आपल्या मोबाईलवर व्हॉट्स ॲप क्रमांकाच्या माध्यमातून, त्यानंतर ग्राहक सेवा संपर्क क्रमांकावरून एका अनोळखी महिलेने संपर्क साधला. या महिलेने आपली सविस्तर माहिती देऊन आपण बिटकाॅईनमध्ये (कूटचलन) गुंतवणूक केली तर आपणास अल्प कालावधीत अधिकचा परतावा मिळेल असे तक्रारदार गुंंतवणूकदाराला सांगितले. माहितगार महिलेच्या बोलण्यावर गुंतवणूकदाराने विश्वास ठेवला. अनोळखी महिलेने गुंतवणूकदाराला एक लिंक पाठवली. या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूकदाराने टप्प्याने अनोळखी महिलेच्या सूचनेप्रमाणे एकून 21 लाख 99 हजार रूपये बिटकाॅईनमधील गुंतवणुकीसाठी आपल्या बँक खात्यामधून महिलेने दिलेल्या बँक खात्यावर वळते केले. ही रक्कम भरणा केल्यानंतर अधिकच्या परताव्यासाठी गुंतवणूकादाराने तगादा लावला. त्यावेळी महिलेने प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदाराने याप्रकरणी ऑनलाईन माध्यमातून पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर या अर्जावरून मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करून घेतला. पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी या फसवणूक प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान दर आठवड्याला कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात तीन-चार ऑनलाईन गुंतवणूक माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. ऑनलाईन गुंतवणुकीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे