

ठाणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार (दि.5) आज जाहीर करण्यात आला असून, यंदा ठाणे जिल्हाचा निकाल ९३.७४ टक्के लागला असल्याची माहिती ठाण्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील ९६ हजार ८९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८९ हजार ८२७ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात यंदा १.६६ टक्क्यांनी वाढ झाली असून, मागील वर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के एवढा लागला होता.
११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्यभरात इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातील १९७ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातून १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यापैकी ८९ हजार ८२७ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ४५ हजार १७० मुले तर ४४ हजार ६५७ उत्तीर्ण मुलींचा समावेश आहे.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींचीच सरशी दिसून आली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.०६ टक्के एवढी असून, मुलांचा निकाल ९२.४७ टक्के लागला आहे.