

डोंबिवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवली एमआयडीसीत सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप आणि मिलापनगर रेसिडेंन्टस् वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.9) सकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या फेरीत लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरीक असे 105 जण सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या माधवी भाऊसाहेब चौधरी आणि मिलापनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा माया परांजपे उपस्थित होत्या. या सायकल फेरीला झेंडा दाखवून सुरूवात केली तसेच त्यांच्याच हस्ते समारोप करून भाग घेणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हर्षल सरोदे, वर्षा महाडिक, सुवर्णा राणे, सरोज विश्वामित्रे, योगिता थोटांगे, कल्पना बोंडे, दिपा नाईक, शोभा चौगुले, आदी महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
सदर फेरी मिलापनगरमधील साफल्य बंगाल्याजवळून निघून ग्रीन्स इंग्लिश स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोड, कावेरी चौक, सुभाष डेअरी, मॉडेल कॉलेज बस स्टॉप, सर्व्हिस रोडने वंदेमातरम् उद्यान ते परत साफल्य बंगला येथे येऊन या फेरीची सांगता झाली. ज्यांनी सायकलफेरीत भाग घेतला त्या सर्वांना मेडल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या फेरीत अनेकांनी तर वेगवेगळ्या पेहरावासह पारंपारीक वेशभूषेत सहभागी होऊन संदेश देण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सुरक्षा, स्वच्छता, आदींसह छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, विविध भाषिक व प्रांतिक वेषभूषा महिला आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत केल्या होत्या. काही ज्येष्ठ पुरूषांनी देखिल यात भाग घेतला होता. उत्कृष्ट वेषभूषा करून सहभागी झालेल्या तीन जणांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अद्विका गाडेकर (लहान मुले गट), दिपाली राणे (तरूण महिला गट) आणि गीता खंडकर (ज्येष्ठ महिला) आश तिघींनी उत्कृष्ट वेषभूषा पारितोषिके पटकावली.