

ठाणे : खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आता शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले असताना ठाणे तब्बल 1 हजार 822 शाळांमधील लाखो विद्यार्थी अजूनही कॅमेर्यांअभावी असुरक्षित आहेत. बदलापूर प्रकरणानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सीसीटीव्ही ना बसविलेल्या शाळांवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
बदलापूर घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी राज्य सरकार विविध पावले उचलत आहे. ठाणे जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, बदलापूरच्या घटनेमुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापूर येथील चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणांमुळे शाळेतील सीसीटीव्हीचे महत्त्व वाढले आहे. असे असले तरीही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्यावर आहे. सरकारने शाळांना काही नियम घालून दिले आहेत. त्याची दखल घेत तातडीने सरकारकडून उपाययोजना करण्याचे आदेश झाले आहे. त्यास अनुसरून चौकशी केली असता तब्बल एक हजार 822 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव उघडकीस आला आहे.
जिल्हाभरातील चार हजार 784 शाळा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक असल्याची नोंद आहे. त्यापैकी दोन हजार दोन हजार 962 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांची व्यवस्था आहे. यामध्ये शहरी भागातील एक हजार 954 शाळांचा समावेश असून नगरपरिषद व ग्रामीण भागातील अवघ्या एक हजार 8 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांची व्यवस्था आहे. उर्वरित एक हजार 822 शाळांमध्ये आजपर्यंतही कॅमेर्यांची व्यवस्था केली नसल्याचे शासकीय अहवालावरून दिसून येत आहे. यामध्ये एक हजार 146 शाळा ग्रामीण व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील शाळांचा समावेश आहे. तर शहरी भागातील तबल 676 शाळांत सीसीटीव्हीचा अभाव आहे.