

डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंतचा उन्नत मार्गाचा तिढा अखेर सुटला आहे. हा मार्ग बांधण्यासाठी अनेक संकटे येत होती. मात्र हा तिढा आता सुटला आहे.
हा मार्ग बांधण्यासह १५ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठीचा एकूण ६०.५३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. यातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ३६ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली असून लवकरच या मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या संतनगर आणि म्हसोबा नगरातील रहिवाशांना न्याय मिळणार आहे. येथील रहिवाशांचे पुनर्वसन झाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
या भागाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी एएमआरडीएकडे तगादा लावला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा उड्डाणपूल, मुंब्रा वाय जंक्शन, कल्याण रिंग रोड, मोठागाव-माणकोली उड्डाणपूल यासारख्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मतदार-संघात वाहतुकीला वेग मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवली ते कल्याण रेल्वे मार्गावर असलेल्या ठाकुर्लीचे रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंत उन्नत मार्गाचे बांधकाम आणि १५ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ३६ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये अशी...
उन्नत मार्ग : लांबी - ३६० मीटर, रुंदी -७.५ मीटर
रस्त्याची लांबी : १,०५० मीटर, रुंदी - ७.५/८.५ मीटर
या प्रकल्पाचे फायदे असे..
वाहतुकीची क्षमता वाढेल. प्रवासाचा वेळ कमी होईल आणि विलंब टळेल, प्रदूषण आणि इंधनाचा अपव्यय टळेल.
दुर्घटनांचा धोका रोखण्याचा संकल्प
ठाकुर्ली लेव्हल क्रॉसिंग ते मानपाडा चौकादरम्यानच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम आणि १५ मीटर रुंदीच्या जोडरस्त्यांचा विकास या प्रकल्पामध्ये करण्यात येणार आहे. परिसरातील वाढता वाहतुकीवरील ताण, प्रवासातील विलंब, तसेच दुर्घटना आणि अपघातांचा धोका रोखण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाकुर्ली, मानपाडा, डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार असून, स्थानिक भागातील वाहतूक जलदगतीने होण्यास हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.
बाधित ८८ कुटुंबीयांचा प्रश्न निकाली
या प्रकल्पाच्या टप्प्यात ठाकुर्ली पूर्वेकडे रेल्वे स्टेशनजवळच्या संतवाडीतील ६० कुटुंबे आणि लगतच्या म्हसोबा नगर झोपडपट्टीतील २८ कुटुंबे बाधित झाली आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आता निकाली लागणार आहे. या घरांचे तोडकाम करण्यात येणार आहे. बाधित कुटुंबांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. या सर्व कुटुंबीयांना बीएसयूपी योजनेतील घरे देण्यात येणार आहेत. याबाबत प्रक्रिया देखील जलदगतीने राबविण्यात येत आहे.