

आसनगाव (ठाणे) : गावदेवी प्रासादिक भजन मंडळ, मढ येथील सुप्रसिद्ध भजन साम्राज्ञी, युट्यूबर आणि महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार प्राप्त गायिका तनुजा बाळू शिंगोळे या आपल्या कलेच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रासह राज्याबाहेरही त्यांनी अनेक ठिकाणी भजन सेवा देत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भजन सादरीकरणातून मिळणाऱ्या मानधनातून त्या नेहमी समाजासाठी आणि धार्मिक कार्यांसाठी योगदान देत असतात. मंदिरांचे संवर्धन, धार्मिक स्थळांसाठी निधी संकलन, तसेच माऊलींच्या पालख्यांसाठी आर्थिक हातभार अशा विविध माध्यमातून त्या समाजकार्य करतात.
इतकेच नव्हे, तर तनुजा शिंगोळे या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षण क्षेत्रातही मदतीचा हात देतात. समाजसेवेची ही नितांत आवड आणि कलेसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
भजन आणि समाजकार्य या दोनही क्षेत्रांचा सुंदर संगम साधत तनुजा शिंगोळे या भजन साम्राज्ञी म्हणूनच नव्हे तर समाजसेवक कलाकार म्हणूनही लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहेत.