

शहापूर : राजेश जागरे
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण हे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी ओवरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणनाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता. मात्र धरण क्षेत्रात धुंवाधार पाऊस पडत असल्याने धरण तुडुंब भरुन वाहू लागले आहे. या धरणाच्या 38 दरवाज्यांपैकी 19 दरवाजे उघडण्यात आले असून यामधून 22105.20 क्यूसेस्क पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती शहापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
मागील दहा दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं शहापूर तालुक्यातील धरणांच्या पाण्याची पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. तानसा धरणातून मुंबईकरांना प्रतिदिन 455 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या धरणाला एकूण 38 दरवाजे असून त्यांची उंची 133 फूट आणि लांबी 2834.64 मीटर असलेल्या तानसा धरणाची 40 हजार 660 दशलक्ष गॅलन पाणी साठवण्याची क्षमता आहे.
धरण क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिला तर तानसाचे सर्वच 38 दरवाजे उघडावे लागतील, अशी शंका व्यक्त केली जाते. तानसा पाठोपाठ मोडकसागर धरणही लवकरच भरण्याची शक्यता असून आज-उद्या मोडक सागर देखील तुडुंब भरुन वाहू शकतो, असा अंदाज तानसा जल विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
पावसामुळं रखडलेल्या शेतीच्या कामांना देखील वेग आला असून तालुक्यातील सर्व शेतजमिनी पाण्यानं भरलेल्या दिसत आहे. तसंच जून महिन्यात पाऊस न पडल्यानं येथील धरणातील पाणीसाठा कमी होत होता, त्यामुळं मुंबई मनपानं ठराविक ठिकाणी पाणी कपात केली. मात्र, जुलैच्या तिसर्या आठवड्यात शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली असल्यानं तालुक्यातील भातसा आणि मध्य वैतरणा धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा धरणा लगत असलेल्या गावांना खैरे या गावातील रहिवाश्यांनी सतर्क रहाण्याचे आदेश, जिल्हा आपत्ती व्यवस्थापननी दिले आहेत. तानसा नदी काठावर शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेडवहाळ, डिंबा, खैरे, भिवंडी तालुक्यातील बेरशेती, एकसाल, चिंचवली, कुंदे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपूरी, वाडा तालुक्यातील निंबवली, मेट, गोराड, वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, आडणे, भाताणे, अंबोडे, पारोळ, सायवण, काशीद कोरगांव, हेडावणे व चिमणे या तानसा नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.