बदलापूर: पुढारी वृत्तसेवा : बदलापूर येथे मंगळवारी झालेल्या आंदोलनात वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी अर्वाच शिवीगाळ केली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला आहे. त्यामुळे महिला पत्रकाराचा गुन्हा दाखल करून म्हात्रे यांना अटक करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनाला आज (दि.२०) सुरुवात केली.
जोपर्यंत या प्रकरणात एफआयआर दाखल करून म्हात्रे यांना अटक करत नाही. तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा अंधारे यांनी यावेळी दिला आहे. अंधारे यांनी जुन्या नगरपालिकेपासून पूर्व पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून बदलापुरात झालेल्या अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच हे आंदोलन भडकवण्यात ज्यांचा वाटा आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी करत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.