Supermoon | कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुपरमून दर्शन

चंद्राचे टिपूर चांदणे... या चांदण्यात आनंद लूटण्यासाठी कोजागरी पौर्णिमा
Supermoon | कोजागरी पौर्णिमा
Supermoon | कोजागरी पौर्णिमाpudhari news network
Published on
Updated on

ठाणे : यावर्षी बुधवार 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री कोजागरी पौर्णिमा साजरी करावयाची आहे. त्या रात्री आकाशात सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा.क.सोमण यांनी दिली. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. वातावरणात धूलिकण नसतात. चंद्राचे टिपूर चांदणे पडते.. त्या चांदण्यात मित्र-आप्तेष्टांसह आनंद घेता यावा यासाठी कोजागरी पौर्णिमा येते. या दिवशी रात्री केशरी मसाला दूध किंवा पोहे, नारळपाणी देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.

कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि को जागर्ति? म्हणजे कोण जागा आहे असे विचारते. जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.

को जागर्ति?

को जागर्ति? याचा अर्थ केवळ शारीरिकदृष्ट्या कोण जागा आहे असा नाही. तर शरीराची, घराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, वेळ पाळण्यात, शिस्तीचे व नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे? असा त्याचा अर्थ आहे. त्याला समाधानाची लक्ष्मी प्राप्त होत असते. जिथे स्वच्छता आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे नीतिमान लोक राहतात, जिथे योग्य दिशेने परिश्रम करणारी माणसे राहतात तेथे लक्ष्मींचा रहायला आवडते, अशी कोजागिरीची महती त्यांनी सांगितली.

चंद्रबिंब 14 टक्के मोठे व 30 टक्के जास्त प्रकाशित दिसणार

यावर्षी कोजागरीच्या दिवशी खरोखरच दुग्धशर्करा योग आलेला आहे. कारण या आश्विन पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचे दर्शन होणार आहे. 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सुपरमूनचे दर्शन होणार आहे. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर सुपरमून दर्शन घडते. अशावेळी चंद्रबिंब 14 टक्के जास्त मोठे आणि 30 टक्के जास्त प्रकाशित दिसते. 17 ऑक्टोबर रोजी पृथ्वीपासून 3 लक्ष 57 हजार 173 किलोमीटर एवढ्या जवळ येणार आहे. आश्विन पौर्णिमेचा प्रारंभ बुधवारी रात्री 8 वाजून 41 मिनिटांनी होणार असून समाप्ती गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी सायं. 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी चंद्रोदय सायं. 5-27 वाजता होणार असून रात्रभर चंद्र आपल्याला आकाशात सुंदर दर्शन देणार आहे. तसेच गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी सायं. 6-09 वाजता चंद्रोदय होणार असून रात्रभर आपणांस आकाशात दर्शन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news