Summer vacation | उन्हाळा आला... सुट्टी आली... गजबजल्या अंगणात लहानग्यांची धमाल झाली!

Thane News | कैरी-आंबा, झाडांच्या सावलीत खेळ आणि निरागस बालपणाचा उत्सव
Summer  vacation  |  उन्हाळा आला... सुट्टी आली... गजबजल्या अंगणात लहानग्यांची धमाल झाली!
Published on
Updated on

विरार (ठाणे): मार्च-एप्रिलचा कालखंड उजाडला की शिक्षणाच्या परीक्षा संपतात आणि लहान मुलांच्या आयुष्यात सुरू होते एक बहारदार पर्व - उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे. सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता जाणवत असली तरी मुलांमध्ये मात्र वेगळाच उत्साह दिसून येतो. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीचं स्थान केवळ आरामाचं नसून, खेळण्याचं, शिकण्याचं आणि आनंद लुटण्याचं असतं.

गार झाडांची सावली अन् पारंपरिक खेळ

विरार पूर्व गावाकडील भागांत तर या सुट्ट्या म्हणजे एक सणच जणू. घराजवळच्या बागा, आंबा-कैरीची झाडं, मोकळी मैदाने, विहिरींची काठं आणि गार झाडांच्या सावली - ही सगळी ठिकाणं लहानग्यांनी व्यापलेली दिसतात. दिवसाची सुरुवात झाडाखाली बसून आंबा-कैरी गोळा करत, डब्यातून घरून आणलेले खाऊ वाटून खात, गप्पा मारत, आणि विविध पारंपरिक खेळ खेळत होते. पोरणी, लगोरी, लपाछपी, डोंगरदरी, विटीदांडी यांसारखे खेळ आजही विरार मधील जळबाववाडी या परिसरात लहान मुलांकडून उत्साहाने खेळले जातात.

सौर ग्रीष्म ऋतू मधील कैर्‍यांचा मोहोर

उन्हाळा हा केवळ उष्णतेचा ऋतू नसून तो निसर्गसौंदर्याचाही काळ आहे. कैर्‍यांची मोहोर, आंब्यांची सळसळ, आणि मातीचा सुगंध यामुळे एक वेगळं वातावरण तयार होतं. लहान मुलांसाठी ही सृष्टी एक खेळमालिका बनते. आंब्याच्या झाडावर चढून कैर्‍या तोडणे, झोके घेणे, उन्हाच्या झळा विसरून जमिनीवरून गवत उचलत खेळण्यात रमणे, हे सगळं त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतं.

पारंपरिक कला शिकवण्यावर भर

शहरातील मुलेही या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेताना दिसतात. बागेत, गार्डनमध्ये सायकल चालवणे, रोलर स्केटिंग करणे, वॉटर बॅलून फोडणे, घरगुती स्विमिंग पूलमध्ये खेळणे, घराजवळील ग्रुपमध्ये विविध खेळांचे आयोजन करणे - अशा उपक्रमांनी त्यांचा दिवस भरलेला असतो. काही घरांमध्ये मुलांना पारंपरिक कला शिकवण्यावर भर दिला जातो - जसं की फुगे फुगवणे, पतंग उडवणे, किंवा चित्रकला, संगीत, नृत्य यांसारख्या छंदांना वेळ देणे.

खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रयत्न

काही कुटुंबे या काळात आपल्या मूळगावी जातात. शहरातील मुलांना गावातील निसर्ग, मोकळं आकाश, गार विहीर, मातीचा ओलावा, आणि घरगुती लोणचं, पन्हं, कैरीचा रस यांचं अप्रूप वाटतं. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये कुटुंब, नातेवाईक, आणि शेजारधार्‍यांमध्ये एक अनोखं स्नेह जपला जातो. पारंपरिक पद्धतीने घरामध्ये तयार होणारी लोणचं, पन्हं, आमरस यामुळे खाद्यसंस्कृतीही जपली जाते.

आंब्याचा गोडवा, बालमित्रांचा सहवास

या काळात अभ्यासाची दडपणं कमी असून मुलांमध्ये नैसर्गिक जिज्ञासा जागी राहते. निसर्ग निरीक्षण, वेगवेगळे प्रयोग करून पाहणे, नव्या गोष्टी शिकणे, आणि प्रात्यक्षिक ज्ञान मिळवणं - हे सर्व काही खेळ-धमाल करत असतानाच घडतं. उन्हाळ्याच्या सुट्टीतील या सगळ्या अनुभवांचं महत्त्व फार मोठं आहे. हे दिवस मुलांच्या मनावर कोरले जातात - कधी आजीसोबत गोष्टी ऐकताना, कधी आंबा चोखताना, कधी पाय उघडेच रस्त्यावरून धावताना. बालपणाची ही मौल्यवान आठवण त्यांच्यासोबत आयुष्यभर राहते. म्हणूनच उन्हाळा म्हणजे फक्त उष्णता नाही - तो आहे गोड कैर्‍यांचा गंध, आंब्याचा गोडवा, बालमित्रांचा सहवास, आणि मोकळ्या मनाने जगलेला अनुभवांचा ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news