

पनवेल (ठाणे) : उलवे, शिवाजीनगर येथील सिडको उद्यानात दगडांच्या आत सापडलेल्या सापाच्या अंड्यांना ‘केअर ऑफ नेचर’ संस्थेच्या सर्पमित्रांनी दिलेल्या योग्य उपचारामुळे जीवनदान मिळाले असून, या अंड्यांमधून तब्बल सापाची 28 पिल्ले जन्माला आली आहेत. 10 जुलै रोजी ही पिल्ले बाहेर आली असून त्यांना वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले.
ही उल्लेखनीय घटना ‘केअर ऑफ नेचर’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घडून आली. ही संस्था प्राणी, पक्षी, सर्प आणि वन्यजीवांचे रक्षण व संवर्धन यासाठी सक्रियपणे काम करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे नोड अध्यक्ष विकी देवेंद्र यांनी ही धाडसी आणि संवेदनशील कामगिरी पार पाडली.
विकी देवेंद्र यांना सिडको उद्यान परिसरात दगडांच्या आत सापाची अंडी आढळून आली. त्यांनी प्रसंगावधान राखत ती सर्व 30 अंडी काळजीपूर्वक बाहेर काढून एका वाळूने भरलेल्या सुरक्षित बंद डब्यात 21 दिवस ठेवली. या काळात योग्य तापमान व वातावरण राखून त्यांनी या अंड्यांची विशेष काळजी घेतली.
या 30 अंड्यांपैकी तब्बल 28 अंड्यांतून पिल्ले सुरक्षितपणे जन्माला आली. याबाबतची माहिती विकी देवेंद्र यांनी महाराष्ट्र वनविभागाच्या उरण परिक्षेत्राचे अधिकारी कोकरे यांना दिली. कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सर्पपिलांना निसर्गाच्या अधिवासात म्हणजेच जंगलात मुक्त करण्यात आले.