Snake Bite News Thane | सर्पदंश झालेल्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू

शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप
कसारा, ठाणे
प्रेम लहानू सदगीर (वय 14 )(छाया: शाम धुमाळ)
Published on
Updated on

कसारा (ठाणे): शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे प्रेम लहानू सदगीर (वय 14 ) हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना सर्पदंश होऊन त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथे प्रेम लहानू सदगीर (वय 14 ) हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना बॉल आणण्यासाठी गेला असता त्याला सर्पदंश झाला. त्यानंतर तात्काळ प्रेमला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर अनुपस्थित असल्याने उपचाराऐवजी केवळ रक्त तपासणी करण्यात आली. तब्बल एक तास कोणतेही औषधोपचार न करता प्रेमला बेडवर वेदनेने तडफडत होता. प्रेम आणि त्याचे पालक रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांना वारंवार विनवण्या करत होते. “मुलाला त्रास होतो आहे, कृपया उपचार करा” अशी आर्त विनवणी करत असतानाही कुणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर प्रेमच्या तोंडातून लाळ येऊ लागल्यावर आणि स्थिती गंभीर होत गेल्यावर डॉक्टरांनी धाव घेतली. त्या क्षणी रुग्णालय प्रशासनाने त्याला ठाणे येथे हलवण्याचा निर्णय घेतला. परंतु वाटेतच प्रेमचा मृत्यू झाला.

कसारा, ठाणे
सर्पदंश होऊन प्रेम लहानू सदगीर (वय 14 ) याचा उपचाराअभावी मृत्यू झाला.Pudhari News Network

आई-वडिलांच्या आक्रोशाने परिसर हेलावला

प्रेमच्या आई-वडिलांनी डॉक्टर व नर्स यांना वारंवार विनवण्या करूनही त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर जीव सोडताना ते काहीच करू शकले नाहीत. एकुलता एक मुलगा गमावल्याने त्यांच्या दुःखाला पार उरला नाही.

आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

शहापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक औषधे आणि उपचार सुविधा वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी रुग्ण दगावण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तालुका जंगल आणि डोंगराळ भागाने व्यापलेला असून येथे सर्पदंशाच्या घटना सामान्य आहेत. तरीही वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे बळी जात आहेत.

स्थानिक आमदार आणि खासदार आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मोठ्या रुग्णालयांची इमारत असूनही तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती ही गरीब जनतेसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news