Murbad bus stand reconstruction : मुरबाडमध्ये बसस्थानकाच्या दारातच प्रवाशांची फरफट

पूर्ण भाडे घेऊनही रस्त्यावर उतरविण्याचा संतापजनक प्रकार, प्रशासनाविरोधात नाराजी
Murbad bus stand reconstruction
मुरबाडमध्ये बसस्थानकाच्या दारातच प्रवाशांची फरफटpudhari photo
Published on
Updated on

मुरबाड शहर ः मुरबाड बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने त्याचा थेट फटका प्रवासी, बस चालक आणि वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. तालुक्यातून आगारात येणाऱ्या अनेक बस प्रवाशांना बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून लांब अंतरावर, थेट मुख्य रस्त्यावर उतरवत असल्याचे चित्र सध्या सर्रास पाहायला मिळत आहे.

एकीकडे बसस्थानकाचे प्रवेशद्वार तर दुसरीकडे प्रवाशांना भर रस्त्यात उतरविले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बस थांबविण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नसताना चालकांना अचानक रस्त्यात बस थांबवावी लागत आहे.

Murbad bus stand reconstruction
Ratnagiri News : शहरात केवळ निश्चित थांब्यावरच बसेस थांबणार

परिणामी इतर वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. बसमधून उतरविल्यानंतर प्रवाशांना आपले सामान, वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि महिलांना भर उन्हात पायी चालत बसस्थानकापर्यंत जावे लागत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरून चालताना किंवा रस्ता ओलांडताना एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रवाशांकडून परिवहन महामंडळ पूर्ण प्रवासी भाडे आकारते. प्रवाशांना छापील तिकीट दिले जाते. त्यामुळे केवळ प्रवासच नव्हे तर सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचविण्याची जबाबदारीही परिवहन व्यवस्थेची असल्याचे प्रवासी सांगत आहेत. अशा परिस्थितीत बसस्थानकात न नेता रस्त्यावर उतरविणे ही प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबतची गंभीर बाब मानली जात आहे.

दुसरीकडे, बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांना अनेकदा बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. काहींना बसच्या मागे धावत जावे लागते. मात्र त्याच प्रवाशांना बसस्थानकापासून दूर रस्त्यावर उतरविताना कोणतीही संवेदनशीलता दाखविली जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

Murbad bus stand reconstruction
Pimpri Chinchwad News: घोषणांचा पाऊस, पण विकास कुठे? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; घोटाळ्यांची मालिका सुरुच

बसस्थानकाचे काम किती काळ चालणार, कामाचा वेग का वाढविला जात नाही, प्रवाशांसाठी तात्पुरती सुरक्षित उतराई व्यवस्था का उभारली जात नाही, याबाबत प्रशासन आणि परिवहन विभागाने स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

... अर्ध्या सेवेबाबत चौकशीची मागणी

बसस्थानकात नेण्याऐवजी रस्त्यावर उतरविणे, उन्हात चालण्यास भाग पाडणे, वाहतुकीच्या धोक्यात प्रवाशांना सोडणे आणि तरीही पूर्ण भाडे आकारणे यामुळे मुरबाड आगाराचा कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांना उतरविले जाते, तेथून आगारची संरक्षण भिंत तोडून आत जाण्यासाठी मार्गिका केली असून त्याच ठिकाणी समोर इंधन व गॅरेज यंत्रणा आहे. त्यामुळे चालक आपल्या सोयीनुसार हे शॉर्टकट्स मारीत आहेत, की तसे आगार प्रमुखांकडून आदेश आहेत? याबाबत चौकशी मागणी होत आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या संथ कामाचा फटका नेमका सामान्य प्रवाशांनाच का बसावा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news