

ठाणे : राष्ट्रीय सहकार धोरण 2025 च्या अनुषगाने राज्यातील सहकार धोरणात अनुकूल बदल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ३२ सदस्यांच्या उच्चस्तरीय समितीवर ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे आणि कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ च्या अनुषंगाने राज्यातील सहकार कायद्यात अनुकूल सुधारणा करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ३२ सदस्यांचा समावेश असून त्यामध्ये ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे त्याचबरोबर महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आदींचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून सहकार कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या शिफारशी ही समिती करेल. त्यामुळे सहकाराला एक वेगळी दिशा मिळेल. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून सहकार क्षेत्राला उभारी देण्याचे काम सुरू असून ही समिती त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे सहकारात सकारात्मक बदल होऊन सहकारी संस्थांना बळ मिळणार आहे.