

Datta Jayanti celebrations in Dubai
डोंबिवली : सालाबादप्रमाणे दुबईत यंदाही श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पूर्णवाद ग्लोबल ह्युमन फाऊंडेशन आणि इंस्पायर इव्हेंटस् तसेच दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे व मित्र-परिवाराने मुस्लिम बहूल देश असलेल्या दुबईमध्ये आयोजित केलेल्या या महोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच्या रेलचेलीमुळे परिसराला भक्तिमय वलय प्राप्त झाले होते.
हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील, विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला सातासमुद्रापार असलेल्या दुबईस्थित मराठी बांधवांनी भक्तीभावाचे वातावरण निर्माण केले होते.
पहाटेपासून रात्रीपर्यंत चाललेल्या या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये दत्तगुरूंचा पाळणा, पालखी, पादुका पूजन, अभय सावंत यांची मंत्रमुग्ध करणारी भजन संध्या, आदींचा समावेश होता. तर बालनाट्य - प्रभू देखीला दास संतुष्ट जाहला - वारसा एक जपणूक हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले होते. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे सद्गुरूंच्या पादुकांचा पालखी सोहळा आणि दत्त जन्मचा उत्सव, त्यानंतर भजन व सामूहिक दत्त जाप, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत कु. गार्गी सरोदे यांची सुंदर अशी गणेश वंदना भरतनाट्यम् द्वारे देण्यात आली.
कु. भार्गवी जाधव यांची भक्तीमय गायन, तसेच श्रीमंत ढोल-ताशा पथकाच्या मानवंदना देण्यात आली. असे अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र पारनेर येथून आलेले पूर्णवादाचर्य-पूर्णवाद भूषण ॲड. गुणेश दादा पारनेरकर यांच्या निरूपणाने श्री गुरूदेव दत्तांच्या तत्वज्ञानाची सुंदर आणि मनाला भिडणारी मांडणी अनुभवायला मिळाली, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण मुख्य आकर्षण ठरले होते.
संपूर्ण महोत्सवाचे आयोजनकर्ते पुष्पेंद्र सरोदे, चंद्रशेखर जाधव, सह-सहकारी प्रसाद मांडे, धनंजय सरोदे, महेश प्रधान, संजय पाटील, योगेश कराड, राजेंद्र गोळेगावकर, अतुल गायकवाड, संतोष भस्मे, आदींची अथक परिश्रम घेतले. पूर्णवाद नारी फोरमसह उपस्थित सर्वांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे यंदाही दत्त महोत्सव सातासमुद्रापार भक्तिमय वातावरणात पार पडल्याचे चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले.