

किन्हवली (ठाणे) : संतोष दवणे
ऊन पावसाचा खेळ रंगवणार्या आणि साहित्यिकांना भूरळ घालणार्या श्रावणमासाचे आगमन होताच शहापूर तालुक्यातील गावागावात आध्यात्मिक परंपरा वृद्धिंगत करणार्या ग्रंथ पारायणांना सुरुवात झाली आहे.
शेतात रोपे लावणीनंतर मिळत असलेला मोकळा वेळ आणि श्रावणातील विविध व्रतवैकल्ये, सण-उत्सव यांना मराठी कुटुंबांत असलेले महत्त्व या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्याचे आगमन होताच सर्वच शेतकर्यांच्या घरांत पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार विविध धार्मिक ग्रंथांच्या अध्याय वाचनाचा श्रीगणेशा करण्यात आला.त्यामुळे शहापूरात एकीकडे सह्याद्रीच्या कड्याकपारींत कोसळणार्या फेसाळत्या धबधब्यांवर गर्दी करणारे पर्यटक आणि दुसरीकडे गावागावात घुमणारा ईश्वरभक्तीचा नाद असे चैतन्यदायी वातावरण पहावयास मिळत आहे.
शहापूर व मुरबाड तालुक्यांत दरवर्षी श्रावण महिन्यात शेतकरी बांधव धार्मिक-अध्यात्मिक ग्रंथांचे विधीवत पूजन करून ग्रंथपारायणाला सुरुवात करतात. संपूर्ण श्रावण महिना दिवसभरातील 4 ते 6 तास ईश्वरी लीलांचे वर्णन करणार्या ग्रंथाचे वाचन करण्याची परंपरा ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ या तालुक्यांतील गावागावात जोपासली जात आहे. यालाच ’अध्याय लावणे’ असे म्हणतात. रोज दुपारी व रात्री जेवणं आटोपल्यावर हे ग्रंथपारायण केले जाते. गावातील विशिष्ट व्यक्तीच्या घरी किंवा मंदिरात भाविक लोक जमतात व लयीत वाचन करणार्यांकडून अध्याय विवेचन समजून घेतात. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी ग्रंथवाचनाचा समारोप करतांना छोटीशी पूजा करुन उपस्थितांना सुग्रास भोजन दिले जाते. यालाच समाप्ती म्हटले जाते. सोहम शक्तीधाम अनसईमाता देवस्थान बाभळे-नायकाचापाडा येथे तपस्वी सद्गुरू हरिदासबाबा यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथ पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. यासोबतच श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थान, कपलेश्वर देवस्थान लवले, श्रीक्षेत्र संगमेश्वर, चेरवली मठ येथेही पारायणाला सुरुवात झाली.
अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या ग्रंथपारायणासाठी रामचरित्र सांगणारा रामविजय, कृष्णलीला वर्णन करणारा हरिविजय, संतमहती मांडणारा भक्तिविजय, महाभारतावर आधारित पांडवप्रताप, शिवलिलामृत, नवनाथ कथासार, डोंगरेमहाराज रचित तत्वार्थ रामायण, श्रीमद भागवतरहस्य, भगवतगीता, ज्ञानेश्वरी, सद्गुरुचरित्र, सिद्धांतबोध अशा ग्रंथांना प्राधान्य दिले जात असते. प्रत्येक गावात विशिष्ट ठेक्यात ग्रंथवाचन करणारी माणसे वर्षानुवर्षे अध्याय लावत असून अशा वाचकांना सन्मानाने अध्याय वाचनासाठी निमंत्रित केले जात आहे.