

कसारा (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वरस्कोळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कंपनीमधून रेडिओअॅॅक्टिव्ह किरणोत्सर्ग होत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या औद्योगिक प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे परिसरातील वातावरणात विषारी वायूंचा प्रसार होत असल्याचे वैज्ञानिक चाचण्यांद्वारे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणावर सेवाकर विभागाचे उपायुक्त डॉ. चेतनसिंग राजपूत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी स्वतः या किरणोत्सर्गाची पुष्टी केली आहे. वैज्ञानिक चाचण्यांमध्ये न्युक्लिअर रेडिओ डिटेक्टर व रेडिओग्राफी फिल्म्सचा वापर करून हे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी सदरची तक्रार सिबीआयला दिली असून त्यानंतर प्रशासनाकडू न हा किरणोत्सर्ग थांबवण्यात आला असला तरी गेली अनेक वर्ष हे बिनदिक्कत सुरू असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही.
या घटनेमुळे वरस्कोळ व आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीजवळील घरांमध्ये राहणार्या नागरिकांसह, कंपनीतील कामगार व महामार्गावरून प्रवास करणारे हजारो नागरिक यामुळे संभाव्य धोक्याच्या छायेखाली आले आहेत. किरणोत्सर्गामुळे कर्करोग, त्वचारोग, श्वसनाचे विकार यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेतली जात असून, पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग तसेच अणुऊर्जा नियामक मंडळ यांची संयुक्त तपासणी अपेक्षित आहे. तसेच सदरच्या कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात ग्रा.पं. वरस्कोलच्या हद्दीत पाच पाच गावे व 20 पाडे आहेत. संबंधित कंपनी राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने या ठिकाणी किरणोत्सार होत आहे. आमच्या लक्षात आले असून ते आमच्या ग्रा.पं.हद्दीत राहणार्या नागरिकांसाठी घातक आहे. शासनाने योग्य ती कारवाई करावी यासाठी ग्रा.पं.चे संपूर्ण सहकार्य असेल.
किशोर शेलवले, उपसरपंच ग्रुप ग्रा.पं.वरस्कोळ
ग्रामस्थांनी कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून, या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकार्यांवर व कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पर्यावरणावर झालेल्या या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. ही घटना प्रशासनासाठी तसेच राज्य सरकारसाठी एक गंभीर इशारा असून, औद्योगिक प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबत कठोर धोरणांची अंमलबजावणी आवश्यक ठरते. दरम्यान कंपनी प्रशासन आपल्या कंपनी आवारात अनेक बेकायदेशीर कामे करीत असल्यामुळे कंपनीच्या आत जाण्यास सर्वसामान्य लोकांना मज्जाव केला जात आहे.