

ठाणे : ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक शिवदास घोडके यांचे कर्करोगाने रविवारी (दि.१४) रात्री निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. दिग्दर्शक अजितेम जोशी यांचे ते साडू होत. त्यांच्या पार्थिवावर नवी मुंबईतील बेलापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
घोडके हे मुळचे नांदेडचे. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे ते विद्यार्थी. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची 1982 मध्ये त्यांनी शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी पुण्याच्या फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इनिस्टयूट मध्येही शिक्षण घेतले. गेली 40 वर्षे ते रंगभूमीवर कार्यरत होते. अनेक विद्यार्थीही त्यांनी घडवले. कांचनताई सोनटक्के यांच्या विशेष मुलांच्या शाळेत ते विशेष मुलांना नाटक शिकवत.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून आल्यावर त्यांनी अविष्कार नाट्यसंस्थेचे महाभोजन तेराव्याचे हे नाटक केले. त्यांना 3 वर्षापूर्वी हाडाचा कर्करोग झाला. त्यातून ते बरे झाले होते. त्यांनी नुकतेच इप्टासाठी अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई कोणाची हे नाटक केले. शेवंता जिती हाय यासारखी अनेक नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली. राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी स्वप्ना आणि मुलगा गुलजार असा परिवार आहे.