

ठाणे : शिवरायांचे आठवावे रूप... शिवरायांचा आठवावा प्रताप! या उक्तीनुसार छत्रपती शिवाजी महाराज अद्वितीय प्रभूती होत. त्यांच्या पराक्रमाचा जागर करण्याहेतु शिवजयंती प्रित्यर्थ ठाणे रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तर कॅबिन आणि फलाट क्रमांक 7 आणि 8 वर कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघातर्फे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील गड कोट बघितल्यावर आजही मराठी अस्मितेचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष हे गडकिल्ले आहेत. प्रतापगड, रायगड, तोरणा, शिवनेरी अशा किल्ल्यांवर भ्रमंती करतेवेळी अथवा चित्र प्रदर्शनातून किल्ले बघताना प्रत्येकाच्या मनात एक आदर निर्माण होतो. हाच धागा पकडून कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघातर्फे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजू कांबळे यांनी दिली.
ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 या बरोबर ठाणे स्थानक व्यवस्थापक कार्यालय या जागेत किल्ल्यांची छायाचित्र लावण्यात आली आहेत. तोरणा, रायगड, विशाळगड, विजयदुर्ग, अजिंक्यतारा, शिवनेरी, पन्हाळगड, लोहगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, लालमहाल, मुरुडजंजीर असे साधारण 25 किल्ल्यांची छायाचित्र या ठिकाणी बघायला मिळत असून दोन दिवसीय प्रदर्शनात ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 19 फेब्रुवारी अर्थात शिवजयंती पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
छाया चित्र प्रदर्शनात ठेवलेले प्रत्येक किल्ला बघताना एक वेगळाच आनंद मिळतो आहे. शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर तात्काळ उभा राहिला आहे. आम्हाला सर्वच किल्ल्यावर भ्रमंती करता आली नाही. मात्र या प्रदर्शनामुळे किल्ल्यांचे दर्शन घडले.
अनुराधा कुलकर्णी, ठाणे