

नेवाळी : सोमवारी सकाळपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने ठाणे तालुक्यातील शिळफाटा परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. ठाणे मनपाच्या दिवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणार्या दोस्ती गृहसंकुल ते शिळफाटा परिसरातील रास्ता महापुरात हरवल्याने वाहनचालकांना वाटच दिसेनाशी झाली होती. नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण पूर परिस्थितीत कारणीभूत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. दिवा विभागातील शीळ आणि डायघर गावात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील पाण्याने प्रवेश केला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
शिळफाटा परिसर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या परिसरातून महानगरांमध्ये चाकरमानी कामासाठी जात असतात. तर औद्योगिक क्षेत्रात देखील अवजड वाहनांची ये-जा सुरु असते. परंतु सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने कल्याण ग्रामीण भागात हाहाकार माजवल्याचे चित्र दिसून आले आहे.
शिळफाटा परिसरातील शीळ गावात महामार्गावरील पाण्याने काही नागरिकांच्या घरांमध्ये प्रवेश केला आहे. तर डायघर गावात देखील पाण्याने प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रशासनाचा शिळफाटा परिसरातील नाले सफाई न झाल्याचा दाखल सोमवारची कोसळलेल्या पावसाने दिला असल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेची नाले सफाई न झाल्याचा दाखला सोमवारी पावसाने दिला आहे.
शिळफाटा परिसरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली असताना महामार्गावरील नदीत फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच दिसून आला आहे. त्यामुळे या परिसरातील नालेसफाचा दावा चौकशीच्या फेर्यात अडकण्याची चिन्ह दिसून येत आहेत.