

ठाणे : पहलगामवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला असून यात धर्म, जात यासारख्या गोष्टी आणायच्या नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात जे उपाय करत आहेत, त्यास आमचे पूर्ण सहकार्य राहील, ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी येथे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथील पाचपाखाडी परिसरात तुळजाभवानीचे मंदिर उभारले आहे. या मंदिरातील तुळजाभवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी मंत्री अनिल देशमुख या सोहळ्याला उपस्थित होते. याप्रसंगी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काही लोक म्हणतात, मी अशा धार्मिक कार्यक्रमांना जात नाही. मात्र हे अर्धसत्य असल्याचे आता सर्वांना कळले असेल. मी लहान असल्यापासून कित्येक पूजा केल्या आहेत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही दोन कुटुंबे एकत्र आली तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.