

शहापूर : हंगाम सुरू होऊनही आदिवासी विकास महामंडळाची आधारभूत भात खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने भात खरेदी केंद्रे तातडीने सुरू करून शासनाच्या निर्धारित आधारभूत किमतीने भात खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शहापूर तालुक्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भात उत्पादक शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून भात उत्पादनात नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना उरलेल्या पिकातून तरी योग्य आर्थिक मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी भात हे केवळ पीक नसून वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे.
शेतीसाठी घेतलेले कर्ज, मजुरी, खते-बियाणे, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी भात विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर शेतकरी अवलंबून असतात. अशा परिस्थितीत शासकीय खरेदी केंद्रे वेळेत सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घ्यावी लागते. व्यापाऱ्यांकडून कमी दराने भात खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळत नाही.
दरम्यान शासनाकडून शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार देण्यासाठी आधारभूत किंमत योजना राबविली जाते. मात्र ही योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मदतीला तेव्हाच येऊ शकते, जेव्हा खरेदी केंद्रे वेळेत सुरू होऊन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडेल. केवळ आधारभूत किंमत जाहीर करून उपयोग नाही. तर शेतकऱ्यांचा उत्पादित माल निर्धारित दराने खरेदी करण्याची यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे.
खरेदी केंद्रे सुरू होण्यास होणारा विलंब हा शेतकऱ्यांसाठी अप्रत्यक्ष आर्थिक नुकसानीचे कारण ठरत आहे. तथापि शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपायचे असेल, तर आधारभूत भात खरेदी केंद्रे ही केवळ शासकीय औपचारिकता न राहता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देणारी यंत्रणा बनली पाहिजे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्रे तातडीने सुरू होणार की, शेतकऱ्यांना यंदाही खासगी व्यापाऱ्यांच्या दरावर समाधान मानावे लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहापूर तालुक्यातील शेतकरी यंदा निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आहेत. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाताला योग्य भाव मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने भात विकण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने कोणतीही दिरंगाई न करता आधारभूत भात खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत; किंबहुना शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शासनाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
वसंत पानसरे तालुकाध्यक्ष, प्रहार संघटना शहापूर.