Shahapur leopard attack : शहापूर तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जगण्याच्या धडपडीत कृष्णाचा गेला बळी; आदिवासी कुटुंबाच्या वेदनांतून उघड झाले वास्तव
Shahapur leopard attack
शहापूर तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरpudhari photo
Published on
Updated on

शहापूर : राजेश जागरे

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. परंतु प्रत्येक घटनेमागे केवळ वन्यप्राण्यांचा धोका असतो का, की त्यामागे व्यवस्थेचे अपयशही दडलेले असते. परिणामी वनविभागाने वेळीच उपाययोजना केली असती तर कृष्णाचा बळी गेला नसता. शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील कळभोंडे जवळील लाद्याच्या वाडीतील गुलाबबाई यांच्या 8 वर्षीय कृष्णाचा बिबट्याने घेतलेल्या बळीने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

गुलाबबाई आगीवले या तीन मुलांची आई. पतीने काही वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. उघड्यावर संसार, कमावते कोणीही नाही आणि तीन लहान मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी. सरकारकडून “मुलांना शाळेत पाठवा, शिक्षण द्या” असा संदेश दिला जात असला तरी रोजच्या भाकरीचा प्रश्नच मोठा असतांना शिक्षणाची लढाई लढणे या कुटुंबासाठी अधिक कठीण झाले होते.

Shahapur leopard attack
Sangli water issue: सांगली, मिरज, कुपवाड शहरांतील पाणीप्रश्नावरून महापालिकेत गदारोळ

भुकेची आग स्वस्थ बसू देत नाही. गावात रोजगार नाही. मनरेगा योजना कागदावर असली तरी प्रत्यक्षात काम नाही. हाताला काम नसतांना पोटाची खळगी कशी भरायची, हा प्रश्न गुलाबबाईंसमोर उभा होता. अखेर जगण्यासाठी त्यांनी आपल्या तीनही मुलांना लादेवाडी येथे मामाकडे ठेवले आणि स्वतः कामाच्या शोधात आलेफाटा परिसरात कांदे काढण्याच्या मजुरीसाठी जावे लागले. या भागात बेरोजगारीचे भयाण वास्तव आहे. त्यातच पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. शेती कोरडी, हाताला काम नाही, रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांना गाव सोडून मजुरीसाठी स्थलांतर करावे लागते.

परिणामी गावे आणि वाड्या ओस पडत चालल्या आहेत. एकेकाळी जंगलात वाघाशी दोन हात करणारी आदिवासी जमात आज जगण्यासाठी झगडतांना दिसते. विकासाच्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात त्या किती उतरतात हा प्रश्न कायम आहे. जंगलांची अवस्था देखील चिंताजनक आहे. डोंगर जळून उघडे पडले आहेत. जंगलांना आग लागते की लावली जाते याचा तपास नाही.

या भागातील पाणीटंचाईवर कधी ठोस आढावा घेतला का? पाणीपुरवठा किंवा सिंचनासाठी नवीन योजना राबविण्याचा प्रयत्न झाला का? मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले का? कायमस्वरूपी रोजगार निर्माण करणारे उद्योग किंवा प्रकल्प आणण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवला का? गावे जोडणारे रस्ते, पूल आणि मूलभूत सुविधा उभारण्याचे काम कितपत झाले, उच्चशिक्षित तरुण वर्गाला रोजगाराबाबत प्रश्न उपस्थित केला का? याबाबतही स्थानिक नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

Shahapur leopard attack
Vasai-Virar Flood Solution: वसई-विरार शहराला पुराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

दरम्यान आदिवासी विकासाच्या नावाने अनेक योजना राबवल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र जमिनीवरील वास्तव पाहिले असता अनेक कुटुंबांना अजूनही मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रोजगार, पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या वेदना या घटनेतून पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

व्यवस्थेच्या अपयशाचा बळी

गुलाबबाई यांच्या 8 वर्षीय कृष्णाच्या मृत्यूला फक्त “बिबट्याचा हल्ला”असे म्हणणे सोपे आहे. पण, या घटनेमागे बेरोजगारी, पाणीटंचाई, स्थलांतर आणि विकासाच्या अपुऱ्या योजना या साखळीतील अनेक प्रश्न उभे राहतात. त्यामुळे हा केवळ वन्यप्राण्यांचा हल्ला नसून व्यवस्थेच्या अपयशाचा बळी असल्याची भावना सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. आता प्रश्न असा आहे की, अशा घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का? की यापुढे तरी या भागातील पाणीटंचाई, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना केल्या जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news