

यावर्षी 6 मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्याने जुलै अखेर शहापूर तालुक्यात सुमारे 93 टक्के पाऊस कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील सर्व धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र अवेळी लागलेला पाऊस आणि पेरणी फसल्याने भाताचे पिक घेणारे शेतकरी लावणीसाठी पुरेशी भातरोपे न रुजल्याने हवालदिल झाले आहेत. परिणामी लावणीसाठी सध्या अनुकूल पाऊस पडत असला तरी बर्याच शेतकर्यांना आपली काही भातशेती ओसाड सोडावी लागणार आहे.
2024 च्या मान्सूनचा विचार करता यावर्षी जुलैपर्यंतच मुबलक पाऊस पडल्याने शहापूर तालुक्यातील सर्वच धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. जून महिन्यात शहापूर तालुक्यात 128 टक्के म्हणजे 540.1 मिमी पाऊस कोसळला असून जुलै महिन्यात 22 जुलैपर्यंत 471.8 मिमी पाऊस झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात 1094.2 मिमी पाऊस शहापूर तालुक्यात पडतो. 2025 च्या हंगामात जुलैअखेर शहापूरात 1017.7 मिमी एकूण पावसाच्या 93 टक्के पाऊस बरसला आहे. मागच्या वर्षी 22 जुलैपर्यंत 912.9 मिमी पाऊस झाला होता. त्यामानाने यावर्षीचे पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारी शहापूर तालुक्यातील धरणे तुडूंब भरली आहेत.
22 जुलै रोजी भातसा धरण 83.43 टक्के भरले असून धरणात 786.02 दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे बुधवारी किंवा गुरुवारी भातसा धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मोडकसागर 99.02 टक्के भरले असून पाणीपातळी 127.66 दलघमीपर्यंत गेली आहे. तानसा धरणात 91.55 टक्के 132.82 दलघमी पाणी साठले असून मध्य वैतरणा जलाशयात 94.32 टक्के 182.53 दलघमी पाणी साठा झाला आहे. परंतु भातशेतीवर गुजराण करणारा शेतकरी चिंतेत सापडल्याचे दिसून येत आहे.
पुरेसा पाऊस आणि धरणांत वाढत असलेला विपुल पाणीसाठा यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शहापूरवर अवलंबून असणारे मुंबईकर खुशीत असले तरी भातशेती करणार्या शहापूरच्या शेतकर्यांना अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. परिणामी शहापूरमधील भाताचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मे महिन्यात अवकाळीच्या नावाने 6 मेपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र या अवकाळी पावसाने जर दडी मारली तर दुबार पेरणी करावी लागेल, या आशंकेने अनेक शेतकर्यांनी उशिरा पेरणीचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र जूनमध्ये पावसाने असे धुमशान घातले होते की, पेरणी केलेले बियाणे एकतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले किंवा साठलेल्या पाण्यात कुजले. त्यामुळे प्रत्यक्ष लावणीला शेतात उतरल्यावर बहुतांश शेतकर्यांना आवणाची (भातरोपांची) कमतरता भासू लागली. परिणामी अनेक शेतकर्यांची काही शेती यावर्षी ओसाड राहणार आहे.