

डोंबिवली (ठाणे) : वाहतूक नियंत्रण विभागाने महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. कल्याण-मुरबाड महामार्गावरील शहाड उड्डाणपुल ३ ते २३ नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूकीत मोठा बदल करण्यात येत आहे. या महामार्गावर असलेल्या शहाड उड्डाणपुलावर डांबरीकरणासाठी वाहतूक अन्य ठिकाणांनी वळविण्यात येणार आहे.
शहाड उड्डाणपुलावरील डांबरीकरणाच्या कामासाठी पुढील २० दिवस प्रवासी आणि वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ३ ते २३ नोव्हेंबरपर्यंत शहाड उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण-माळशेज महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी वाहतुकीचे काटेकोर नियोजन आणि पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
ठाण्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत मे. संरचना कंपनीतर्फे शहाड उड्डाणपुलावर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा कालावधी ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. या काळात पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
कल्याण-माळशेज महामार्ग हा उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्याला अहमदनगर व पुण्याकडे जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने, या कामादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी या काळात सर्व मार्गांवर दिशा फलक, मार्गदर्शन बोर्ड आणि रिफ्लेक्टरसह सूचना चिन्हे बसविण्याची तयारी केली आहे. ३ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वाहनचालकांना थोडा संयम ठेवावा लागणार असला तरी या कामानंतर शहाड पुलावरून प्रवास अधिक सुखद होईल. वाहतूक नियंत्रण विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या कामामुळे शहाड उड्डाणपूल अधिक सुरक्षित, मजबूत होणार असून कल्याण-उल्हासनगर दरम्यानची वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभहोणार आहे. दररोज हजारो वाहनांनी वापरला जाणारा हा पूल आता दीर्घकाळ टिकणाऱ्या दर्जेदार रस्त्याने सज्ज होणार आहे.
प्रशासनाचे आवाहन
ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले की, शहाड उड्डाणपुलावरील डांबरीकरण हे जनहिताचे व अत्यावश्यक काम आहे. प्रवाशांसह वाहतुकदारांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस पथके सतत गस्त घालतील आणि मार्गदर्शन करतील, असेही डीसीपी शिरसाठ यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवांना मुभा
ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सेवा अखंडित सुरू राहतील.